Aishwarya Shete emotional post for Vidisha Mhaskar: ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. २०२४ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने जवळजवळ दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

या मालिकेत पाच मुलींची मैत्री पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या, वेगवेगळी स्वप्ने असलेल्या, वेगळ्या स्वभावाच्या मुली जेव्हा एकत्र येतात, तेव्हा काय घडते. त्यांच्यात कशी मैत्री होते आणि ती मैत्री आयुष्यभर कशी टिकते, कधी चुका होतात, दुरावा येतो; पण मैत्री कायम टिकून राहते, हे पाहायला मिळाले. एकीच्या आयुष्यात काही अडचण आली, तर सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन, त्यावर मात करत असत. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

मालिका संपल्यानंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या शेटेने शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. तिने खास पोस्ट शेअर करीत विदिशा म्हसकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Award Banner

“जवळजवळ दोन वर्षांचा हा प्रवास…”

विदिशा म्हसकरबरोबरचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले, “आज मी तुझ्या वाढदिवशी माझ्या वेगळ्या पद्धतीनं तुला नाही, तर माझ्या तेजाभाईला निरोप देत आहे.”

पुढे तिने लिहिले, “जवळजवळ दोन वर्षांचा हा प्रवास होता. पण, आपले एक-दोन फोटो सोडले, तर कुठलेच फोटो किंवा व्हिडीओ सापडले नाहीत, ज्यामध्ये आपण दोघी नॉर्मल आहोत. विदिशा म्हसकर मला तुझ्याबद्दल फार काही लिहायचं नाही. कारण- तुला माहीत आहे की, तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस. पण, सेटवर आपण जो दंगा करायचो, त्याची मला फार आठवण येईल. खरं तर संपूर्ण आनंदबागचीच खूप आठवण येणार आहे.”

अभिनेत्रीने असेही लिहिले, “माझा वेडेपणा, मस्ती आणि ऊर्जा यांची बरोबरी करू शकणारी व्यक्ती मला याच सेटवर भेटली. त्यासाठी मी देवाची कृतज्ञ आहे.”

मजेशीरपणे तिने असेही लिहिले, “असो! आहे तशीच तीन वर्षांची राहा. फक्त करिअरमध्ये खूप मोठी हो. आय लव्ह यू. अशीच मजा करत राहू. आपण पुन्हा एकत्र छान काम करू, अशी इच्छा आहे.”

विदिशा म्हसकर म्हणाली…

ऐश्वर्याच्या या पोस्टवर विदिशाने प्रेम व्यक्त करत “आय लव्ह यू” असे लिहिले. तसेच. तिने लिहिले की, आपल्याला आनंद बागची खूप आठवण येईल; पण आपण भेटत राहू.

दरम्यान, आता या अभिनेत्री पुन्हा कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.