ऐश्वर्या शेटेने नुकतंच तिच्या अभिनय क्षेत्रातील अनुभवांबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने तिला आलेले चांगले-वाईट प्रसंग सांगितले. ऐश्वर्याने तिची एका मालिकेसाठी निवड झाल्यानंतर तिला अचानक त्यातून काढून टाकण्यात आलं असं सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या मालिकेसाठी तिने अभिनेत्री आणि निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांच्या मालिकेला नकार दिला होता. अस म्हटलं आहे.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला. यामुळे तिला वाईट वाटलं होतं आणि या मालिकेमुळे सुचित्रा बांदेकर यांची मालिकाही हातून गेली असं तिने सांगितलं या आधी तिने ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं. भूमिका खऱ्या आयुष्यातील वयापेक्षा खूपच मोठ्या वयाची झाल्याने तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी तिच्या हातात दुसरी मालिका होती म्हणूनही तिने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

ऐश्वर्याला आलेला वाईट अनुभव

ऐश्वर्या म्हणाली, “एकाच पठडीतल्या भूमिकांमध्ये अडकू शकते या भीतीने मी ती मालिका सोडली कारण माझ्या वयापेक्षा खूपच मोठी भूमिका होती ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या हातात कलर्स मराठीची एक मालिका आली होती. आता मी नाव सांगत नाही. मी त्यासाठी कोल्हापुरला जाऊन ऑडिशन दिली. सगळं केलं. लूक टेस्ट, पैशाची बोलणी सगळं झालं होतं. तेव्हा मला सुचित्रा ताईंनी शब्बास सुनबाईसाठी मला विचारलं होतं.”

ऐश्वर्या पुढे म्हणाली, “त्या हक्काने म्हणाल्या होत्या की करणार आहेस की नाही तू आपला शो मला काय ते सांग. पण तेव्हा या शोसाठी बोलणं झाल्याने मी सुचित्रा ताईंना म्हटलं की ताई मला इकडे या लोकांनी लॉक केलं आहे मालिकेसाठी. पण त्यानंतर यांच्याकडून मला काहीच अपडेट आली नाही. त्यांनी मला नाकारलं. मला कळवलं पण नाही मला सरळ टीव्हीवर तो शो दिसला. माझं असं झालं की मी वाट पाहत होते यासाठी मी सुचित्रा ताईंना नाही म्हटलं. मला तोंडावर पडल्यासारखं झालं.”

ऐश्वर्याने पुढे सांगितलं की देवाच्या कृपेने तिला चार महिन्याने त्याच वाहिनीवर ‘रमा-राघव’ मालिकेसाठी विचारणा झाली. यामध्ये तिने पहिल्यांदाच मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. तिच्याबरोबर अभिनेता निखल दामले यात मुख्य भूमिकेत होता.