Ajay Devgn Crime Patrol Host: मालिका विश्वातील लोकप्रिय क्राइम थ्रिलर मालिका ‘क्राइम पेट्रोल’ने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनेता अनुप सोनीच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे या मालिकेला वेगळी ओळख मिळाली. मात्र आता ‘क्राइम पेट्रोल’च्या नव्या पर्वात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. आता अनुप सोनी यांच्याऐवजी बॉलीवूड अभिनेता अजय देवगण सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार असल्याची चर्चा आहे.

समाजातील गुन्हेगारी आणि त्यावर आधारित कथा मांडणाऱ्या ‘क्राइम पेट्रोल’ मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. यामधील कथा आणि कलाकारांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. गेली अनेक वर्षे अनुप सोनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता. यानंतर आता अजय देवगण या मालिकेशी जोडला जाणार आहे. स्क्रीनच्या रिपोर्टनुसार, अजय देवगणने या मालिकेचे सध्या १५ एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले आहे.

अजय देवगणने केले १५ एपिसोडचे शूटिंग

‘क्राइम पेट्रोल’च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अजय देवगणने स्वीकारली असून त्याने आतापर्यंत १५ एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले आहे. अजय देवगणच्या सूत्रसंचालनाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि कार्यक्रमाला मिळणारा टीआरपी यावर अजय देवगण या मालिकेमध्ये काम सुरू ठेवणार की नाही, हे ठरवले जाणार आहे.

अजय देवगणबरोबर, ‘क्राइम पेट्रोल’च्या नव्या पर्वामध्ये अभिनेता राजेश तैलंग हेही सूत्रसंचालन करताना झळकणार असल्याची चर्चा आहे. याआधी त्यांच्या ‘मिर्झापूर’, ‘दिल्ली क्राइम’ आणि ‘उलझ’मधील भूमिकांचे कौतुक झाले आहे. यानंतर आता राजेश तैलंग छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. पण ते नेमके किती एपिसोडमध्ये काम करणार याची माहिती समोर आलेले नाही. मात्र मालिका विश्वामध्ये लोकप्रिय असलेल्या या ‘क्राइम पेट्रोल’ मालिकेमध्ये आता बॉलीवूड अभिनेत्यांची एन्ट्री झाली आहे. या नवीन बदलांमुळे प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.

पोलीस आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित सिनेमांमध्ये साकारल्या भूमिका

समाजातील गुन्हेगारीवर आधारित असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांनी मनं जिंकली आहेत. मालिकेची जुनी ओळख कायम ठेवून नव्या अंदाजात एपिसोड रिलीज केले जाणार आहेत. अजय देवगणचे सूत्रसंचालन हा निर्मात्यांनी केलेला मोठा बदल असून प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजय देवगणने यापूर्वी अनेक पोलीस व गुन्हेगारी संबंधित सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अजय देवगणने यापूर्वी ‘गंगाजल’, ‘दृश्यम’ आणि ‘सिंघम’ फ्रँचायझीमध्ये पोलीस आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. गुन्हेगारी, तपास आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित भूमिका ही अजय देवगणची ओळख राहिली असून यानंतर आता क्राइम पेट्रोलचे सूत्रसंचालन करणार आहे.