Akanksha Chamola on her Bisexuality: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या घटस्फोटाच्या चर्चेने आधीच चाहत्यांना धक्का दिला होता. त्यातच ‘लॉक अप २’ या रिॲलिटी शोमध्ये आकांक्षा चमोलाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि लैंगिक ओळखीबद्दल अत्यंत खळबळजनक खुलासे केले. आता त्याबद्दल तिने सविस्तर सांगितलं आहे. लग्नाआधी मी बायसेक्शुअल होते आणि ही गोष्ट गौरव खन्नाला सांगितली होती, असं आकांक्षाने सांगितलं. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आकांक्षाच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
आकांक्षा म्हणाली, “मी त्याला लग्नाआधी बायसेक्शुअल असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. माझ्या नवऱ्याने ते स्वीकारलं कारण त्याला ती गोष्ट खूप हॉट वाटली. पुरुषांना या गोष्टी खूप हॉट वाटतात. लोक हे का स्वीकारू शकत नाहीत हे मला समजत नाही. बहुतांश पुरुषांना या गोष्टी आवडतात.”
लग्नानंतर पतीशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता – आकांक्षा चमोला
‘लॉक अप २’ मध्ये ३५ वर्षीय आकांक्षाने लग्नाआधी तिचे महिलांशी संबंध असल्याची कबुली दिली होती. आधी तिने बायसेक्शुअल असल्याचं मान्य केलं आणि नंतर तिने स्वतःला ‘असेक्शुअल’ (अलैंगिक) मानत असल्याचं सांगितलं होतं. लग्नानंतर गौरव खन्नाशी प्रामाणिक राहण्याच्या निर्णयावर आकांक्षा म्हणाली, “लग्नानंतर दुसऱ्या नात्यात न जाण्याचा निर्णय मी जाणीवपूर्वक घेतलेला होता. मी माझ्या नवऱ्याला फसवणार नाही हे ठरवलं होतं. मी एकाच व्यक्तीसोबत राहायचं ठरवलं आणि मी त्याच निर्णयावर ठाम राहिले. आता मी असेक्शुअल झाले आहे, तर अनेक हेटेरोसेक्शुअल महिलाही एका टप्प्यानंतर असेक्शुअल होतात. मग मी लग्नाआधी बायसेक्शुअल होते आणि आता असेक्शुअल आहे म्हटल्यावर त्यात एवढं काय आहे?”
आकांक्षाने पुढे म्हटलं की तिच्या सध्याच्या लैंगिक ओळखीला कायमस्वरूपी मानलं जाऊ नये. “उद्या कदाचित मी जाहीर करेन की मी पॅनसेक्शुअल आहे. त्याबद्दल कोणी काय करू शकतं? मी माझ्या स्वतःच्या भावनांबद्दल बोलत आहे,” असं ती म्हणाली.
आकांक्षा चमोला करिअरबद्दल काय म्हणाली?
बायसेक्शुअल असल्याचा तिच्या करिअरवर काही परिणाम होईल का, यावर आकांक्षा म्हणाली, “एका व्यक्तीने मला सांगितलं की मला ओटीटीवर काम मिळेल पण टीव्हीवर नाही. तर आपण सकारात्मक राहायला हवं. कारण मला ओटीटीवर काम मिळत असेल तर त्यात मला आनंदच आहे. टीव्ही बिझनेस वेगळ्या पद्धतीने चालतो. तुम्ही हेटेरोसेक्शुअल, होमोसेक्शुअल की बायसेक्शुअल आहात यावरून कोणी तुम्हाला काम देणार नाही. जर माझ्यात ती कला असेल आणि त्यांची तशी गरज असेल तर ते मला नक्कीच कास्ट करतील.”
आकांक्षा चमोला व गौरव खन्नाची भेट, लग्न, घटस्फोट
आकांक्षा चमोला आणि गौरव खन्ना यांची भेट २०१५ मध्ये एका ऑडिशनदरम्यान झाली होती आणि भेटीनंतर आठ महिन्यांनी त्यांनी लग्न केलं. ‘लॉक अप २’ मध्ये आकांक्षाने ते दोघे वेगळे राहत असून घटस्फोट घेणार असल्याचं जाहीर केलं. नंतर गौरवने स्पष्ट केलं होतं की ते दोघे वेगळे राहत असले तरी कायदेशीर प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही.
