अक्षय केळकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठी मालिका, चित्रपट आणि ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेत त्याने अनेकांची मनं जिंकली. अभिनेत्याने हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अक्षय इंडस्ट्रीतील अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जो सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. अक्षय केळकरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यामार्फत तो त्याच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यातील घडामोडी शेअर करत असतो. अशताच आता अभिनेत्याने नुकतीच तो मामा झाला असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे.
अक्षय केळकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. विविध व्हिडीओ पोस्ट करत तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींबद्दलही बोलत असतो. अभिनेत्याचा यूट्यूब चॅनेल असून तो त्यामार्फत व्लॉग शेअर करतो. अशातच नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तो मामा झाल्याची गोड बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. अक्षय केळकर अनेकदा त्याची बायको, बहीण आणि आई यांच्याबरोबरचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असतो. अशातच आता त्याची धाकटी बहीण श्रद्धा केळकर नुकतीच आई झाली असून तिला मुलगी झाली आहे.
अक्षय केळकरने पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज
अक्षयने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत “भाई लोक मी मामा झालो” अशी खास कॅप्शन दिली आहे. यावेळी त्याने त्याच्या भाचीबरोबरचा एक फोटो पोस्ट केलाय. तर अक्षयची बायको साधना काकतकरनेही इन्स्टाग्रामवर अक्षयच्या बहिणीच्या मुलीबरोबरचा फोटो शेअर करत मामी झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
साधना काकतकरने इन्स्टाग्रामवर अक्षयच्या भाचीबरोबरचे फोटो शेअर करत “मला माहीत आहे ती खूप छान आहे कारण तिचा जन्मसुद्धा सप्टेंबरमध्ये झाला आहे. तिला गाताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.” खाली तिने “मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण” असंही लिहिलं आहे. यामधून तिने मामी झाल्याचा आनंदही व्यक्त केला आहे.
अक्षय केळकरची बहीण श्रद्धा केळकरनेही इन्स्टाग्रामवर नवरा व लेकीबरोबरचे फोटो शेअर करत आनंदाची बातमी शेअर केली आहे. यावेळी तिने “अखेर आम्ही आई-बाबा झालो! ४ सप्टेंबरला, गोकुळाष्टमीच्या शुभमुहूर्तावर, आमच्या आयुष्यात एका चिमुकल्या परीचं आगमन झालं”. अशी कॅप्शन दिली आहे. अक्षय, साधना व श्रद्धा यांच्या या पोस्टखाली कलाकार मंडळींनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
