Akshay Kelkar Wedding : मराठी मालिका, रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे अक्षय केळकर. ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय मालिका ‘अबीर गुलाल’मध्ये अक्षयने मुख्य भूमिका साकारली होती. सध्या अभिनेता त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकरने त्याच्या गर्लफ्रेंडशी आज ( ९ मे ) लग्नगाठ बांधली. अक्षय केळकर आणि त्याची गर्लफ्रेंड साधना काकतकरबरोबर जवळपास १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते… आता १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या जोडीने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

मेहंदी, ग्रहमख, हळद असे तिन्ही विधी पार पडल्यावर अक्षय-साधनाचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. अक्षय प्रेमाने त्याच्या होणाऱ्या बायकोला रमा म्हणतो. त्यामुळेच या लग्नसोहळ्यादरम्यान अभिनेत्याने ‘रमाक्षय’ हा हॅशटॅग क्रिएट केला आहे.

अक्षय व साधना यांनी लग्नसोहळ्यात खास लूक केला होता. साधनाने गुलाबी रंगाची सुंदर साडी, हातात हिरवा चुडा, दागिने आणि नाकात नथ असा पारंपरिक लूक केला होता. तर, अक्षयने पांढऱ्या रंगाच्या शेरवानीवर बायकोच्या साडीवर मॅचिंग होईल असा बेबी पिंक रंगाचा शेला घेतला होता.

मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी अक्षय-साधनाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अक्षयने लगनातील खास व्हिडीओ शेअर करत याला “फायनली… रमाक्षय” असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अक्षय केळकरने त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल करत होणाऱ्या बायकोची ओळख सर्वांना करून दिली होती. साधना काकतकर ही एक लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. मेतरा, आनंदाचे गाव, नाखवा यांसह अक्षयच्या अनेक गाण्यांना साधनाने तिचा आवाज दिला आहे. साधनाची ओळख सर्वांना करून दिल्यावर, काही दिवसांपूर्वीच या दोघांचं केळवण मित्रमंडळींनी थाटमाटात केलं होतं. आता अक्षय-साधना लग्नबंधनात अडकले आहेत.

दरम्यान, अक्षय केळकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, त्याने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. नुकताच तो ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या सिनेमात झळकला होता. याशिवाय अभिनेता ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता देखील आहे.