Akshaya Deodhar on Kolhapur: अभिनेत्री अक्षया देवधर सध्या झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत तिने भावना ही भूमिका साकारली आहे. खंबीर, तितकीच प्रेमळ, कुटुंबावर प्रचंड प्रेम असणारी अशी ही भावना प्रेक्षकांना खूप आवडते.
अक्षयाला तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेचे शूटिंग कोल्हापूरला झाले होते. आता अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोल्हापूरबद्दल वक्तव्य केले.
“मी शहरात, पुण्यात वाढलेली मुलगी…”
आता अक्षया देवधरने नुकतीच महा एमटीबीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने कोल्हापूरबद्दल वक्तव्य केले आहे. ती म्हणाली, “मी असा कोणताही ठरावीक सण सांगणार नाही. पण, आता लक्ष्मी निवास ही मालिका सुरू होऊन दोन वर्षे झाली आहेत. तर मागची अडीच वर्षे मी कोल्हापूरमध्ये गेले नाही. तर, कोल्हापूरमधून बाहेर पडताना मला कायम असं वाटायचं की, मी दर महिन्याला कोल्हापूरला जाईनच. पण, पुण्यात आल्यानंतर वेगळ्या कामांमध्ये व्यग्र झाले. लग्न झालं. मग पुढचं काम आलं. त्यानंतर मालिका सुरू झाली. तर या सगळ्या व्यापात मी कोल्हापूर बघितलंच नाही. तर मला ते कुठेतरी जाणवतं की, मी म्हणायचे की कोल्हापूरमध्ये न जाता मी एक महिनाही राहू शकणार नाही. आता मला दोन-अडीच वर्षे होतील, मी कोल्हापूरमध्ये पाऊलच टाकलेलं नाही. तर, मला कधी वेळ मिळेल आणि मी कधी कोल्हापूरला जाईन, असं मला वाटतंय.”
याच मुलाखतीत ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे शूटिंग कोल्हापूरमध्ये झाले होते. ज्या ठिकाणी शूटिंग झाले, त्याची तुला आठवण येते का, असे अक्षयाला विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली, “हो मला आठवण येते. ते माझं टेलिव्हिजनवरील पहिलं शूटिंग होतं. पहिल्यांदा स्क्रीनसमोर मी काम करीत होते. त्यामुळे त्या मालिकेच्या शूटिंगचं ठिकाण आठवतं, शेत आठवतं. सतत निसर्गात शूटिंग करणं आठवतं. मी शहरात, पुण्यात वाढलेली मुलगी आहे. त्यामुळे मी कधी शहर सोडून गेलेलेच नव्हते. थेट मी शूटिंगच्या निमित्तानं कोल्हापूरला गेले होते. त्याआधी मला वाटायचं की, पुणे सोडून मी कामासाठी मुंबईत जाऊ शकत नाही. पण, त्यानंतर मी कोल्हापूरला गेले. माझ्यासाठी ती गोष्ट खूप चांगली घडली. त्यामुळे मी निसर्गाच्या खूप जवळ गेले. तो अनुभव, निसर्ग, ते शेत आणि तिकडची सगळी खाद्यसंस्कृती, गोड माणसं, त्यांचे प्रेमळ स्वभाव, ते मी कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे कोल्हापूरला शूटिंग करण्याचा अनुभव माझ्यासाठी कमाल आहे”, असे म्हणत अक्षयाने कोल्हापूरला केलेल्या दिवसांची आठवण सांगितली.
दरम्यान, लक्ष्मी निवास या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात. सध्या भावना व आई लक्ष्मी यांच्यात दुरावा आल्याचे दिसत आहे. आता मालिकेत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
