Akshaya Deodhar and husband Hardik Joshi Video: अभिनेत्री अक्षया देवधर सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काम करीत आहे. या मालिकेत तिने भावना ही भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भावना व सिद्धू या जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसते. येणाऱ्या संकटांना सिद्धू व भावना एकत्रितपणे सामोरे जाताना दिसतात.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे नुकतीच निलांबरी निवडणुकीत जिंकली; तर भावनाला हार पत्करावी लागली आहे. या सगळ्यानंतर निलांबरी सर्वांना त्रास देत असल्याचे पाहायला मिळते. आता भावना व सिद्धू यावर काय मार्ग काढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अक्षया देवधरने शेअर केला व्हिडीओ

मालिकेबरोबरच अक्षया तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो यांमुळेदेखील अनेकदा चर्चेत असते. याबरोबरच तिच्या खासगी आयुष्याचीदेखील काही वेळा चर्चा होते. अभिनेत्रीने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर तिचा पती हार्दिक जोशीही आहे.

हार्दिक व अक्षया ट्रिपला गेल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये डोंगराळ प्रदेशासह सुंदर निसर्गाचे दर्शन होते. तसेच, ट्रीहाऊस पाहायला मिळते. ते शेकोटीभोवती गप्पा मारताना आणि खळखळून हसताना दिसत आहेत. अक्षयाचे सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत. तर एका ठिकाणी अक्षया हार्दिकला फुले देत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर घन रानी हे गाणे लावलेले आहे. तसेच, हा व्हिडीओ शेअर करताना अक्षयाने ‘तू आणि मी’ असे लिहिले आहे.

अक्षयाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एकाने लिहिले, “राणादा आणि अंजलीबाई, माझी आवडती जोडी.” दुसऱ्या एकाने लिहिले, “तुमच्या दोघांना आशीर्वाद.” आणखी एकाने लिहिले, “क्यूट कपल.” एकाने लिहिले, “राणादा बारीक झाला.”‌एकाने लिहिले, “खूप सुंदर.” आणखी एकाने लिहिले, “राणादा, अंजलीबाई कायमचे एकत्र तर आहेतच. पण, निदान अक्षयाताईची चालू असलेली मालिका व हार्दिकदादाचे चित्रपट झाल्यावर तरी आम्हाला राणादा, अंजलीबाई पुन्हा एकत्र टीव्हीवर पाहायला मिळावेत ही इच्छा.” अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.

दरम्यान, अक्षया व हार्दिकने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत एकत्र काम केले होते. त्यांच्या या मालिकेला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.