Akshaya Naik Marriage : प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिने तिच्या डोक्यात जशा मुलाची कल्पना केली आहे तसाच जोडीदार तिला भेटावा. अनेकदा अभिनेत्रींनाही त्यांना कसा जोडीदार हवा आहे, त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत याबद्दल विचारलं जातं. अशातच आता लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीनेही याबद्दल सांगितलं आहे.

हिंदी, मराठी मालिका, सीरिज आणि चित्रपटांत काम करत आपल्या सहजसुदंर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. अक्षया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिने आतापर्यंत हिंदी व मराठीतील अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसह काम केले आहे. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या काही आवडत्या मराठी व हिंदी अभिनेत्यांची नावं सांगितली आहेत. यावेळी तिने तिला जोडीदार म्हणून कसा मुलगा हवा आहे याबद्दलही सांगितलं आहे. अक्षया नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

होणाऱ्या जोडीदाराबद्दल काय म्हणाली अक्षया?

अक्षया नाईकने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यामध्ये तिने तिच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत आणि नेमका कसा मुलगा हवा आहे याबद्दल सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी तिने तिला इटॅलियन मुलं खूप आवडतात असं म्हटलं आहे. मुलाखतीत अक्षयाला लग्नाबद्दल घरातले काही बोलत आहेत का? तुला कसा मुलगा पाहिजे आहे? काय गुण असावे असं वाटतं असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “माझी इच्छा खूप आहे, पण मुलगा मिळाला नाहीये अजून. कोणत्या क्षेत्रातला हवा याबद्दल फार विचार केलेला नाही. मला इंडस्ट्रीतला कोणी नसला तरी चालेल. फक्त माझी ही अट आहे की तो कलाकार नसला तरी रसिक असला पाहिजे, त्याला कलेची आवड पाहिजे.”

अक्षया याबद्दल पुढे म्हणाली, “त्याला कुठल्यातरी कलेची आवड असावी, नाहीतर असं नको की त्याला नाटक बघायला आवडत नाही, चित्रपट बघायला आवडत नाही, असा मुलगा नकोय मला.” अक्षयाला यावेळी पुणे की मुंबई असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मुंबई. फार तर फार मी गोव्याला शिफ्ट होईल, पण काम तर सगळं मुंबईतच आहे. जर हे नाही झालं तर मला इटॅलियन मुलगा हवा आहे. मला मुंबईत राहणारा मुलगा भेटला नाही तर मी इटलीतील मुलाबरोबर लग्न करून तिथे राहीन. मला इटॅलियन मुलं खूप आवडतात. मी घरीसुद्धा सांगते की मी तुमच्यासाठी इटॅलियन भावोजी आणणार आहे.

दरम्यान, अक्षयाने आजवर अनेक लोकप्रिय नाटक, मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. ‘यह रिश्ता क्या कहलाता है’मधून ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने मराठीतील ‘सुंदरा’ मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारली. याच मुलाखतीत तिने तिला ललित प्रभाकर, रणबीर कपूर, शाहिद कपूर आणि विकी कौशल यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.