Akshaya Naik on Sundara Manamadhe Bharli: काही कलाकृती वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. यापैकीच एक ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका आहे. कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका २०२० ला प्रदर्शित झाली होती. या मालिकेने जवळजवळ तीन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. २०२३ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, आजही मालिकेतील पात्रे, गोष्ट, कलाकार याबद्दल चाहते बोलताना दिसतात.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक व समीर परांजपे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. अक्षयाने लतिका ही भूमिका साकारली होती. समीरने अभिमन्यू ही भूमिका साकारली होती. हृषिकेश शेलारने दौलत ही भूमिका साकारली होती. या मालिकेतून कलाकारांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
“तुझ्यामुळे सुंदरतेची व्याख्या लोकांपर्यंत फार वेगळ्या पद्धतीने…”
आता अभिनेत्री अक्षया नाईकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मालिकेदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्याबरोबर तिचे सहकलाकारही दिसत आहेत. विविध क्षणांचे हे फोटो आहेत. यामध्ये तिला पुरस्कार मिळाल्याचा खास फोटोही तिने शेअर केला आहे. तसेच, हा तिचा पहिला पुरस्कार असल्याचे लिहिले आहे.
पहिल्या फोटोत अक्षयाच्या म्हणजेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील लतिकाच्या खांद्यावर बैलगाडीचे जू असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने मधुगंधा कुलकर्णींना टॅग करत लिहिले, “ताईचे खास आभार. तुझ्यामुळे सुंदरतेची व्याख्या लोकांपर्यंत फार वेगळ्या पद्धतीने पोहोचली. कलाकार म्हणून मला आव्हान देणारं एक पात्र साकारायला मिळालं याचा आनंद अजून वेगळा आहे.”
दुसऱ्या व्हिडीओत टीव्हीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका लागल्याचे दिसत आहे. तर कलाकार मालिका बघत आनंद व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले, “३१ ऑगस्ट २०२०, ६ वर्षांपूर्वी मी स्वत:ला प्रमुख भूमिकेत पाहिले. त्या दिवशी माझ्या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण झाले.” तिने असेही लिहिले, “खूप फोटो आणि व्हिडीओ आहेत, काय पोस्ट करू काय नको कळेना. कोणाला मेन्शन करायचं राहिलं असेल तर भूल चूक माफ करा.”
आणखी एक फोटो शेअर करत तिने लिहिले, “लतिका, आजही अनेक लोकं मला सुंदरा, लती, लतुडी या नावाने ओळखतात आणि मी नेहमी तुमच्या सर्वांची ऋणी राहीन.” समीर परांजपेबरोबरचा फोटो शेअर करत तिने लिहिले, “माझी हक्काची सर्वात नावडती व्यक्ती.”
याबरोबरच, मालिकेतील शेवटचा शॉट, ८०० एपिसोड पूर्ण झाल्यावर केलेले सेलिब्रेशन, सहकलाकारांबरोबर केलेली मजा मस्ती असे अनेक फोटो पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अक्षया सिनेमा, वेब सीरिज, शॉर्ट फिल्म तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते.
