Akshaya Naik Trimbakeshwar temple Visit: अभिनेत्री अक्षया नाईक सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘मेरे रंग में रंगने वाली’, अशा विविध मालिकांतून अक्षयाने प्रेक्षकांची मने जिंकली. काही दिवसांपूर्वीच तस्करी या सीरिजमध्येही ती दिसली होती. त्याबरोबरच अक्षया शॉर्ट फिल्ममध्येही दिसली होती. सोशल मीडियावर विविध व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचे मनोरंजन करते. तर, काही वेळा ती तिच्या मनातील भावना व्यक्त करते.

आता अक्षयाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोमवारी ती त्र्यंबकेश्वरला गेली होती. तेथील व्हिडीओ तिने शेअर केला. तिने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तिच्या हातात नारळ व कमळाचे फूलही दिसत आहे. तसेच, मंदिरासमोर ती कपाळाला गंध लावून घेत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. मंदिरात गेल्यानंतर ती भक्तिभावाने नमस्कार करते.

अक्षया नाईकने घेतले त्र्यंबकेश्वरचे दर्शन

हा व्हिडीओ शेअर करीत अक्षयाने लिहिले, “मी कधीच त्याला पाहिलं नाहीये; पण मला माहितीये तो आहे. सध्या फक्त माझी परीक्षा घेतोय. माझ्या संयमाची परीक्षा घेतोय. पण, मीसुद्धा तितकीच हट्टी आहे.”

पुढे तिने लिहिले, “मी सहज हार मानत नाही. तुम्हालाही वाटत असेल की, आपण सगळे एकाच नावेतून प्रवास करत आहोत. तर हा प्रवास आनंदानं करूया. एवढा विश्वास ठेवा की, तो आपल्याला सुरक्षितपणे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवेलच आणि कदाचित आपण कल्पना केली होती त्यापेक्षाही सुंदर ठिकाणी घेऊन जाईल.” याबरोबरच, व्हिडीओवर श्रावण आणि महादेव, तसेच त्र्यंबकेश्वर असे लिहिले आहे.

अक्षयाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “हर हर महादेव”, दुसऱ्या एकाने लिहिले, “खूपच छान”, एकाने लिहिले, “गोड हसू”, आणखी एकाने लिहिले, “गोड दिसत आहेस तू”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अक्षयाने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेदरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. तसेच, फोटोमागील आठवणी सांगितल्या. चाहते आजही लतिका म्हणून हाक मारतात, त्यावेळी छान वाटते, असेही तिने लिहिले होते.

दरम्यान, आगामी काळात अक्षया कोणत्या सिनेमातून, प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.