‘बिग बॉस 19’ फेम गायक अमाल मलिक आपल्या गाण्यांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अमालने खुलासा केलाय की एकदा त्याच्या चेहऱ्यावर ४५ टाके पडले होते. इतकंच नाही तर त्याच्या उजव्या कवटीला फ्रॅक्चर झाले होते. उपचारासाठी कर्ज घेतल्याचंही अमाल मलिकने सांगितलं.
पिंकव्हिलाशी बोलताना अमाल मलिक म्हणाला, “माझी शस्त्रक्रिया झालेली नाही, पण मला ४५ टाके पडले होते. माझा उजवा खांदा डिसलोकेट झाला होता. माझा डावा हात फ्रॅक्चर झाला होता. माझं नाक तुटलं होतं. बऱ्याच गोष्टी घडल्या. पण मी टर्मिनेटरसारखा आहे. मी सगळ्यातून बरा होतो आणि म्हणतो, ‘आपण आज हे काम करू.’ असं सगळं सुरू आहे. संगीताबद्दल बोलायचं झाल्यास हा नेहमीच एक मानसिक खेळ असतो. ठरवलं तर माणूस करू शकतो. पण आता मला हळूहळू सर्वकाही सुरळीत करायचं आहे.”
अमाल मलिकला गुडघ्यांचा त्रास
“मला गुडघ्याचाही त्रास आहे. माझ्याकडे गुडघ्यांसाठी ब्रेसेस आहेत. मी शोमध्ये परफॉर्म करताना ते घालतो. नाहीतर माझ्या गुडघ्यांची काय अवस्था होईल, मी कल्पनाही करू शकत नाही. माझ्या मागच्या परफॉर्मन्स दरम्यान झालं असं की मी बिग बॉसमध्ये एका गाण्यावर परफॉ्म केलं. ग्रँड फिनालेतील परफॉर्मन्समध्ये एक शॉट होता. मला फिरून खुर्चीवर बसायचं होतं. मी फिरलो पण माझे गुडघे लचकले. मला गुडघ्यांचा त्रास आहे, यावर उपचार घेणं गरजेचं आहे. आधी माझ्याकडे उपचारांसाठी पैसे नव्हते आणि आता वेळ नाही,” असं अमाल मलिक म्हणाला.
५ लाखांचे कर्ज
अमाल मलिकने चेहऱ्याच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितलं. “मला माझ्या चेहऱ्याच्या शस्त्रक्रियेसाठी ५ लाख रुपयांचं कर्ज घ्यावं लागलं होतं. माझा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. माझी उजवी कवटी फ्रॅक्चर झाली होती. माझ्या बारावीच्या परीक्षेदरम्यान, माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. तरीही मी ३-४ तास फक्त लिहित होतो. मी एका उपकरणाच्या मदतीने माझे डोळे उघडे ठेवले आणि पेपर लिहिला होता,” असं अमाल मलिकने नमूद केलं.
आता स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मला त्रास होतोय हे मला माहित आहे. गाणं तर आयुष्यभर गायचंच आहे, पण थोडा आराम करणंही महत्त्वाचं आहे, असं अमाल मलिक म्हणाला.
२०१७ मध्ये प्रयागराज येथे एका कॉन्सर्टमध्ये अमाल मलिकच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता होती, पण वेळ नसल्याने तो करू शकला नव्हता. त्याचा अजूनही त्याला त्रास होतो. तसेच अमालने बिग बॉस १९ मध्ये सांगितलं होतं की त्याला स्लीप एपनियाचा त्रास आहे. झोपताना त्याचा श्वास १५-२० सेकंदांसाठी थांबतो, म्हणूनच तो मशीन लावून झोपतो.

