बोट (boAt) कंपनीचे माजी मुख्य मार्केटिंग अधिकारी (CMO) अमन गुप्ता यांनी ‘शार्क टँक इंडिया’च्या ५ व्या सीझनमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. एका ताज्या भागात अमन यांनी त्यांनी केलेल्या काही गुंतवणुकींबद्दल सांगितलं. त्यांनी पहिल्या सीझनमध्ये ज्या कंपनीत गुंतवणूक केली होती, तिचे व्हॅल्यूएशन आता ३.७५ कोटी रुपयांवरून थेट १,१०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच, त्यांनी गुंतवणूक केलेल्या एका स्टार्टअपचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नुकतीच क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे.

पहिल्या चार सीझनच्या गुंतवणुकीचा अमन गुप्ता यांनी आढावा घेतला. त्यांनी एकूण १७७ ऑफर्स दिल्या, ज्यापैकी १४१ डील पूर्ण केल्या. गेल्या चार सीझनमध्ये अमन यांनी एकूण ६१.७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमन म्हणाले, “भारतात उद्योजकतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि लोकांचे मनोरंजन करत त्यांना व्यवसायाचे बारकावे शिकवण्यात ‘शार्क टँक’ने मोठी मदत केली आहे. फाउंडर्सवर विश्वास ठेवणं हेच माझं वैशिष्ट्य राहिलंय. जर मला माझ्या टॉप तीन गुंतवणुकींबद्दल सांगायचं असेल तर त्यात सीझन १ मधील ‘Let’s Try’, सीझन २ मधील ‘Manetain’ आणि सीझन ४ मधील ‘EM5’ यांचा समावेश असेल.”

सूर्यकुमार यादव EM5 चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

‘शार्क टँक इंडिया’च्या चौथ्या सीझनमध्ये अमन गुप्ता यांनी ‘EM5’ या परफ्यूम ब्रँडमध्ये गुंतवणूक केली. “EM5 चे फाउंडर्स खूपच चांगले आहेत. त्यांच्याकडे मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी खूप छोटी टीम होती, ती टीम आम्ही वाढवली. मी त्यांच्या फॅक्टरीला भेट दिली आणि त्यांना ऑटोमेशन सिस्टिम वापरण्याचा सल्ला दिला. आम्ही क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घेतलंय. त्याची जाहिरात नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यामुळे लोकांमध्ये या ब्रँडबद्दलची जागरूकता वेगाने वाढत आहे.”

अमन गुप्ता यांनी गुंतवणूक केल्यानंतर EM5 च्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. कंपनीची महिन्याची विक्री १.७ कोटी रुपयांवरून आता ४.५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच, त्यांची फॅक्टरी आधी ६,००० चौरस फूट होती ती आता ३०,००० चौरस फूट झाली आहे.

Manetain ची ग्राहक संख्या १० हजारवरून ४ लाखांवर पोहोचली

‘शार्क टँक इंडिया’च्या दुसऱ्या सीझनमधील ‘Manetain’ या ब्रँडचं अमन गुप्ता यांनी कौतुक केलं. या हेअर केअर ब्रँडमध्ये अमन यांनी गुंतवणूक केली होती. “मी Manetain ला दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मदत केली. पहिली म्हणजे, त्यांचा मार्केटिंगचा गोंधळ होता. मी त्यांना गाइडलाइन्स तयार करून दिल्या. दुसरं म्हणजे कॅटेगरींचा विस्तार. सुरुवातीला ते फक्त कुरळ्या केसांच्या प्रॉडक्ट्सवर लक्ष केंद्रित करत होते, पण त्याची बाजारपेठ खूप मर्यादित होती. मी त्यांना केसांच्या इतर प्रकारांसाठी नवीन उत्पादनं सुरू करण्यास सांगितलं. त्यांनी त्यावर काम केलं आणि कंपनीची प्रगती झाली,” असं अमन गुप्ता म्हणाले.

Manetain ची महिन्याची विक्री १० लाख रुपयांवरून १.२ कोटी रुपये झाली आहे. तसेच त्यांची ग्राहक संख्या १० हजारांवरून ४ लाखांवर पोहोचली आहे.

३.७५ कोटींची कंपनी आता १,१०० कोटींची

अमन गुप्तांनी सीझन १ मधील ‘Let’s Try’ या ब्रँडमध्ये केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक होती, असं म्हटलंय. “मला वाटतं की ‘Let’s Try’ ही ‘शार्क टँक इंडिया’मधील आतापर्यंतची नंबर १ ची गुंतवणूक आहे. मी या कंपनीची रचना सुधारण्यास मदत केली. त्यांना नियमांचे पालन करण्यास सांगितलं. या कंपनीची महिन्याची विक्री १२ लाख रुपयांवरून ४० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे आणि आता लवकरच ते १०० कोटींचा टप्पा गाठतील,” असं अमन गुप्ता म्हणाले.

‘Let’s Try’ या ब्रँडची वार्षिक विक्री १.९ कोटी रुपयांवरून ३०० कोटी रुपये झाली आहे. कंपनीचे व्हॅल्यूएशन ३.७५ कोटी रुपयांवरून थेट १,१०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

‘शार्क टँक इंडिया’च्या ५ व्या सीझनमध्ये अमन गुप्ता यांनी आतापर्यंत सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. त्यांनी २३ व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली असून एकूण २४.६ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.