कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसेल तर अभिनयविश्वात काम मिळवणं सोपं नाही. आउटसायडर्सना इंडस्ट्रीत काम मिळवायला बराच संघर्ष करावा लागतो. बरेच कलाकार त्यांच्या संघर्षाबद्दल, वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत असतात. आता एका टीव्ही अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील सर्वात खंबीर महिलेबद्दल सांगितलं आहे.

‘गंगा माई की बेटियां’ या टीव्ही शोमध्ये ‘स्नेहा’ची भूमिका साकारणाऱ्या अमनदीप सिद्धूने तिचं बालपण आणि कुटुंबाबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. अमदीपने सांगितलं की तिचे वडील कामानिमित्त दुबईत राहायचे, त्यामुळे आईने एकटीने सांभाळ केला.

आईने एकटीने केला सांभाळ

अमनदीप म्हणाली, “माझ्या आयुष्यातील सर्वात खंबीर आणि प्रेरणादायी स्त्री माझी आई आहे. माझे बाबा कामानिमित्त दुबईला असायचे, तेव्हा माझ्या आईने मला आणि माझ्या दोन भावंडांना दिल्लीत एकटीने सांभाळलं. आमचं संगोपन केलं. आमच्या घराची सर्व जबाबदारी फक्त आईवर होती.”

“दिल्लीसारख्या मोठ्या शहरात तीन मुलांची जबाबदारी एका महिलेवर असणं ही साधी गोष्ट नाही. तरीही आईने प्रत्येक परिस्थितीत हिंमत आणि संयम ठेवून कुटुंबाला सावरलं. आमचे शिक्षण आणि भविष्याचा विचार करून तिने प्रत्येक निर्णय घेतला. आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची तिने नेहमी काळजी घेतली. तिनेच आम्हाला खंबीर आणि आत्मविश्वासू बनायला शिकवले,” असं अमनदीप सिद्धू म्हणाली.

आईने स्वतःच्या इच्छा बाजूला सारल्या

अमनदीप म्हणाली, “आमची स्वप्ने पूर्ण करण्याला आईने प्राधान्य दिलं. आमच्यासाठी माझ्या आईने अनेकदा स्वतःच्या इच्छा बाजूला सारल्या. आम्हाला आमच्या स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्य आणि पाठिंबा मिळेल याची तिने नेहमी काळजी घेतली. आईने आम्हाला कोणतंही काम करण्यापासून कधीच अडवलं नाही, उलट प्रत्येक पावलावर आमचा उत्साह वाढवला आणि आम्हाला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य दिलं.”

आई आयुष्यातील सर्वात खंबीर स्त्री

“माझी आई माझ्या आयुष्यातील सर्वात खंबीर स्त्री आहे. मला तिच्याकडून खूप प्रेरणा मिळते. कठीण परिस्थितीतही तिने ज्या प्रकारे आम्हाला सावरलं आणि पुढे जाण्याची संधी दिली, ते नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी असेल. माझ्या आईने दिलेलं प्रेम, तिने आमच्यासाठी केलेला त्याग आणि घेतलेले कष्ट याबद्दल मी नेहमीच तिची ऋणी राहीन,” असं अमनदीपने आईबद्दल म्हटलं.