Amchya Ladkya Naik Bai New Serial : ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय त्यांनी आजवर ज्या-ज्या मालिकांमध्ये काम केलंय, त्या सगळ्या सिरियल गाजल्या आहेत. एका सामान्य शिक्षिकेची, तिच्या कुटुंबाची आणि तिच्या मुलींची गोष्ट सांगणारी ही मालिका असणार आहे. मुख्य भूमिकेत ऐश्वर्या नारकर असल्यामुळे या मालिकेला नक्कीच दमदार टीआरपी मिळणार असा अंदाज चाहत्यांनी याची पहिली झलक पाहूनच बांधला होता. आता समोर आलेल्या नव्या प्रोमोतून या मालिकेच्या प्रदर्शनाची वेळ अन् तारीख जाहीर करण्यात आली आहे.
‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या जोडीला झळकणार आहे अभिनेत्री अमृता धोंगडे. बऱ्याच वर्षांनी ती मालिकाविश्वात पुन्हा एकदा पाऊल ठेवणार आहे. यापूर्वी ती ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती. आता अमृता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्यासाठी सज्ज झाली आहे. एका सर्वसामान्य शिक्षिकेचा खडतर प्रवास आणि तिच्या कुटुंबाची कौटुंबिक कथा या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.
नाईक बाई शाळेत शिक्षिका असतात…शाळेतली सगळी मुलं त्यांचा आदर करतात, त्यांना आपलं प्रेरणास्थान मानतात. आपलं प्रत्येक सुख-दु:ख ही मुलं नाईक बाईंबरोबर शेअर करतात. अशीच एक चिमुकली मुलगी नाईक बाईंना पेढे द्यायला येते. यावेळी एक भयंकर परिस्थिती समोर येते ती म्हणजे, शाळेत नाईक बाई सर्वांच्या लाडक्या असतात पण, घरात त्यांना पदोपदी अपमान सहन करावा लागतोय. ही सगळी परिस्थिती डोळ्यासमोर पाहूनही ही चिमुकली मुलगी आपुलकीने मला मोठं होऊन तुमच्यासारखंच व्हायचंय असं म्हणते त्या क्षणाला नाईक बाईंचे डोळे पाणावतात.
‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही मालिका येत्या २० जुलैपासून दररोज संध्याकाळी ६:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यामध्ये ऐश्वर्या नारकर, अमृता धोंगडे यांच्यासह पूजा ठोंबरे, अतुल काळे, शीतल शुक्ला हे कलाकार झळकणार आहेत.
स्टार प्रवाहवर सध्या ६:३० वाजता ‘वचन दिले तू मला’ ही मालिका ऑन एअर होतेय. यापूर्वी अनेकदा या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘वचन दिले तू मला’ अवघ्या सात महिन्यांत ऑफ एअर होणार की याची वेळ बदलली जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.
