Aishwarya Narkar : शाळा… हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर उभी राहतात ती फळ्यावरची अक्षरं, प्रार्थनेचे सूर, मधल्या सुट्टीतला गोंधळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घडवणारे शिक्षक. आई-वडिलांनंतर जर कुणी निःस्वार्थपणे आपल्या मुलांसाठी झटत असेल, त्यांच्या चुकांवर मायेने बोट ठेवत असेल, त्यांच्या यशात स्वतःचं सुख शोधत असेल, तर ते असतात शिक्षक. अशीच आपल्या शाळेवर आणि विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम करणारी, मायेची उब आणि संस्कारांची शिदोरी देणारी एक हाडाची शिक्षिका म्हणजेच नाईक बाई… आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
या मालिकेच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर तब्बल आठ वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन करत आहेत.
नाईक बाईंसाठी शाळा म्हणजे चार भिंतींची इमारत नाही, तर ते एक कुटुंब आहे. शाळेची घंटा म्हणजे त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे त्यांचं समाधान. घर, संसार, जबाबदाऱ्या आणि आयुष्याने दिलेल्या अनेक परीक्षांचा समतोल साधत त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वासाची ज्योत पेटवत राहतात. स्वतःच्या अडचणी कधीही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू न देता, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी त्या अहोरात्र झटत असतात. स्वतःचं घर सांभाळतानाच शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचा त्यांचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे.
या भूमिकेविषयी ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “आठ वर्षांनंतर ‘स्टार प्रवाह’च्या कुटुंबात परतताना खूप आनंद होत आहे. ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही फक्त एक व्यक्तिरेखा नाही, तर आपल्या आयुष्यात भेटलेल्या त्या प्रत्येक शिक्षिकेचं प्रतिबिंब आहे, ज्या स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार न करता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. नाईक बाईंचं विद्यार्थ्यांवरचं प्रेम, प्रत्येक मुलामध्ये उज्ज्वल भविष्य पाहण्याची त्यांची दृष्टी मला खूप भावली. आजही आपण सगळे आपल्या आयुष्यातील एखाद्या आवडत्या शिक्षकाला प्रेमाने आठवतो, तसंच नातं नाईक बाई आणि प्रेक्षकांमध्ये निर्माण होईल अशी मला खात्री आहे. ही भूमिका साकारताना अनेकदा मला माझ्या स्वतःच्या शिक्षकांची आठवण होते. माझ्यासाठी म्हणाल तर आईनंतर बाई अर्थात आमच्या शिक्षिका आहेत त्यांना माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान होतं. तेव्हा त्यांनी शिकवलेल्या बऱ्याच गोष्टी आजही लक्षात आहेत. इतकं प्रेम त्यांनी दिलं की सणाला आवर्जून त्यांच्या घरी जाणं व्हायचं. आजही मी त्यांच्या संपर्कात आहे. माझ्या कार्यक्रमांना, नाटकांना माझ्या शाळेतल्या बाई आजही आवडीने येतात. त्यामुळेच नाईक बाई ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी खूप खास आहे.”
यासह ऐश्वर्या नारकर मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “ही भूमिका अधिक वास्तववादी पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर व्हावी यासाठी मी अनेक वर्षांनी पुन्हा एकदा सायकल शिकण्याचं आव्हान स्वीकारलं. कारण, शारदा या भूमिकेसाठी ती फक्त सायकल नाही तर तिच्या आयुष्यातील संघर्षाचं, जिद्दीचं प्रतीक आहे. बालपणी आम्ही भाड्याने सायकल घेऊन चालवायचो. आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा सायकल हातात घेतली, तेव्हा तीच भीती आणि तोच उत्साह अनुभवला. सुरुवातीला हे मोठं आव्हान वाटलं, पण आमच्या टीमच्या साथीमुळे हे आव्हान मी सहज पूर्ण केलं.”
नाईक बाईंची हृदयस्पर्शी गोष्ट ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका येत्या १० ऑगस्टपासून सायंकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाईल.
