गणपतीच्या दिवसांत ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. हे मूळ गाणं माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या दोन भावंडांनी गायलं आहे. परंतु, या गाण्यावरचा बालकलाकार साईराज केंद्रेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. साईराजचे गोंडस व निरागस हावभाव पाहून सगळेच थक्क झाले होते. सोशल मीडियावर सर्वत्र साईराजची चर्चा चालू होती. आता पुन्हा एकदा हा बालकलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

साईराजने ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेतली आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. अप्पी सर्वांपासून दूर उत्तराखंडमध्ये तिचं कर्तव्य बजावत असते. आता त्यांचा लेक देखील बऱ्यापैकी मोठा झालेला असतो. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत प्रेक्षकांना सात वर्षांचा लीप आल्याचं पाहायला मिळेल. अप्पीच्या मुलाची भूमिका साईराज साकारणार आहे.

हेही वाचा : मुहूर्त ठरला! ‘शिवा’ मालिकेतील अभिनेता अडकणार विवाहबंधनात, शाल्व-श्रेयाच्या घरी लगीनघाई

अप्पी अर्जुनला वचन देते की, ती त्यांच्या मुलाला वडिलांबद्दल कधीच काही सांगणार नाही. अशातच अप्पी आणि तिचा चिमुकला लेक मंदिरात जातात. यावेळी दर्शन घेऊन अप्पी अमोलला सांगते, “तू इथेच उभा राहा मी प्रदक्षिणा मारते” तेवढ्यात या मंदिरात दर्शन घेण्यासाठी अर्जुन येतो. मुलाला वडिलांपासून दूर ठेवण्याचं वचन अप्पीनं निभावलं पण, या छोट्या पावलांनी बाबांना शोधलं…आता सात वर्षांपूर्वी तुटलेली नाती, मालिकेत जोडली जातील का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा : नव्या मालिकांचा सपाटा! ‘कलर्स मराठी’ने केली नव्या मालिकेची घोषणा, जबरदस्त प्रोमो आला समोर

दरम्यान, साईराजच्या मालिकेतील एन्ट्रीमुळे प्रेक्षक आनंदी झाले आहे. त्याचा गोंडस अंदाज प्रत्येकालाचा भावतो. त्यामुळे मालिकेच्या नव्या प्रोमोवर शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव नेटकऱ्यांनी केला आहे.