Amit Bhanushali Lovestory : अमित भानुशाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यानं आतापर्यंत हिंदी व मराठीतील विविध मालिकांमध्ये काम करत त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सध्या तो ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे. यातील त्याच्या भूमिकेलासुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

अमित भानुशाली नेहमीच त्याच्या व्यावसायिक व खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असून त्याचा तिथं मोठा चहातावर्गही आहे. अभिनेता अनेकदा त्याच्या दैनंदिन जीवनातील घडामोडींबद्दलच्या अपडेट यामार्फत त्याच्या चाहत्यांसह शेअर करत असतो. अमितनं आतापर्यंत प्रेमकहाणीवर आधारित अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणीसुद्धा तितकीच फिल्मी आहे. अभिनेत्यानं सहपत्नीक ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्याबद्दल सांगितलेलं.

अमित गुजराती असून त्याची पत्नी श्रद्धा मराठी आहे, त्यामुळे दोघांना कुटुंबीयांकडून होकार मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागलेली. अमितनं श्रद्धाच्या कुटुंबीयांना पटवण्यासाठी वेगळी युक्ती लढवलेली असं त्यानं या मुलाखतीत सांगितलं आहे. अमित भानुशाली व श्रद्धा यांच्या प्रेमकहाणीचा किस्सा नेमका काय आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

Award Banner

कुटुंबियांनी केलेला विरोध

श्रद्धा मराठी आणि तू गुजराती असल्यामुळे तुमच्या कुटुंबीयांकडून काही विरोध झाला का? त्यांची सहमती कशी मिळवली? असा प्रश्न विचारल्यानंतर अमितची पत्नी श्रद्धा भानुशाली म्हणाली, “हो झाला, खूप फिल्मी ड्रामा ॲक्शन क्लायमॅक्स सगळं झालं. पण, गंमत अशी होती की अमित माझ्या बाबांना ओळखायचा, त्याची बाबांशी मैत्री झालेली, त्याने ओळख निर्माण केलेली.”

होणाऱ्या सासऱ्यांशी फोनवर बोलायचा अमित

अमित श्रद्धाच्या वडिलांबरोबरच्या मैत्रीबद्दल म्हणाला, “तिचे बाबा एका दुकानात होते, मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, कसे आहात काका? ते म्हणाले, अरे तू इथे आलास बेटा. म्हटलं, हो जात होतो सहज तुम्हाला भेटलो; तब्येत वगैरे बरी आहे ना तुमची. तुमचा फोन नंबर नाहीये माझ्याकडे, तुमचा नंबर देता का? अशी दोन-तीनदा फेरी मारली, मग त्यांच्याबरोबर फोनवर बोलायचो.”

अमितची बायको पुढे म्हणाली, “त्याचं पहिलं टार्गेट माझे बाबा होते. त्यांच्याशी त्याची चांगली मैत्री झाली. माझ्या भावाच्या मुलाचं बारसं होतं, तर माझ्या बाबांनी त्याला आमंत्रण दिलं; मग तो पुढे अनेकदा आमच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागला. मग माझ्या भावाशी त्यानं संपर्क साधला, त्याच्याशी मैत्री केली.”

मराठी मुलगी असल्यामुळे तुझ्या घरून काही विरोध झाला होता का असं विचारल्यानंतर अमित पुढे म्हणाला, “माझ्या आईला हीच सून म्हणून हवी होती, त्यामुळे तिचा काहीच विरोध नव्हता. आम्ही भानुशाली राजपूत आहोत. आमच्यामध्ये असतं की, भानुशाली भानुशालींशीच लग्न करतात. पण, माझं आणि माझ्या आईचं ठरलं होतं की आम्हाला आयुष्य काढायचंय, आम्हाला ही हवीये, संपला विषय.”