Thalra Tar Mag Fame Actor : मालिका खऱ्या अर्थाने कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहचवतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बरेच वर्षे इंडस्ट्रीत काम करुनही त्यांना हवा तसा ब्रेक मिळालेला नसतो पण मालिकांमुळे मात्र ते घराघरात पोहोचलेले असतात.
मराठी मालिकाविश्वात असाच एक अमराठी अभिनेता आहे ज्याने आजवर हिंदीतही अनेक भूमिका साकारल्या आहेत. परंतु, तो प्रसिद्धीझोतात आला तो एका मराठी मालिकेमुळे. त्याने स्वत: याबाबत सांगितलं आहे. हा अभिनेता म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मधील अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली.
अमितने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने त्याच्या करिअरमधील टर्निंग पॉईंटबद्दल सांगितलं आहे. अमितला यामध्ये “तुझ्या आयुष्यातील अशी भूमिका कोणती ज्यामुळे तुला असं वाटतं की तुला मोठा ब्रेक मिळाला?” असा प्रश्न विचारण्यात आलेला. यावर अमित म्हणाला, “‘ठरलं तर मग’ या मालिकेतील अर्जुनची भूमिका. नाव आणि फेम मला या मालिकेमुळे मिळालं”.
अमित पुढे म्हणाला, “२०१० साली मी ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत सिद्धार्थ ही भूमिका साकारली होती. त्याकाळी ती भूमिका खूप गाजली होती. म्हणून तेव्हा मला वाटलेलं की याच भूमिकेमुळे मला प्रसिद्धी मिळाली. पण नंतर फार काही घडलं नाही. या मालिकेनंतर मी मुख्य नायक म्हणून २-३ शोज केले पण त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खास असं काही घडलं नाही”.
अमित पुढे त्याच्या करिअरमध्ये त्याने काम केलेल्या कलाकृतींबद्दल म्हणाला, “आजपर्यंत जवळपास २२ शोज झालेत, दोन गुजराती, दोन मराठी, दोन हिंदी अशा ६ चित्रपटांतही काम केलं. १०-१२ मराठी शोज केले आहेत. पण या सगळ्यांमध्ये ‘ठरलं तर मग’ हा एकच असा शो आहे ज्याने मला आयुष्यात एक ओळख मिळवून दिलीये”.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये अमित मुख्य नायकाची भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्याची व अभिनेत्री जुई गडकरीची मालिकेतील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत असल्याचं मालिकेला मिळत असलेल्या प्रतिसादावरून तसेच सोशल मीडियावरून दिसून येतं. या मालिकेची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे.