‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अभिनेता अमित भानुशाली सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिका टीआरपीमध्ये नंबर वन आहेच पण, याशिवाय अमित साकारत असलेल्या अर्जुन सुभेदार या पात्राला सुद्धा प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. ऑनस्क्रीन अर्जुन ज्याप्रकारे मनमिळावू, नेहमी सर्वांना आपलंसं करणारा आहे…खऱ्या आयुष्यात सुद्धा अमित अगदी तसाच आहे. करिअरच्या सुरुवातीला ज्या काकांनी मदतीचा हात दिला, अशा पोस्टमन काकांना अमितने त्याच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रित केलं होतं.

अमितने मीडियासमोर या काकांची ओळख करून दिली. त्यांचे आभार मानून, अमित त्यांच्या पाया पडल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी तो काहीसा भावुक सुद्धा झाला होता.

अमित म्हणतो, “या जगात… त्यातही अलीकडच्या काळात कुणीच कुणाला काहीतरी फायदा असल्याशिवाय मदत करत नाही. पण, अंधेरी स्टेशनवर बसलेल्या, ऑडिशनसाठी सर्वत्र फिरणाऱ्या एका मुलाला मार्ग दाखवणं, त्याचा हात धरून त्याला पुढे नेणं ही खूप मोठी गोष्ट होती. कोणतीही अपेक्षा न करता तेव्हा या काकांनी मला मदत केली होती. २००७-२००८ ची ही गोष्ट आहे. त्यावेळी या काकांनी मला मदत केली होती. या काकांमुळे मी आज एवढा मोठा होऊ शकलो.” त्यांना सगळे पोस्टमन काका म्हणून ओळखतात असंही अमितने सांगितलं.

अमित भानुशालीचा जन्म गुजराती कुटुंबात झाला आहे. त्यामुळे त्याच्या घरातील कोणीच इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नव्हतं. करिअर सुरू केल्यावर सुरुवातीला त्याला या क्षेत्रात कोणाचंही पाठबळ नव्हतं. जवळपास दीड वर्षे अभिनेता इंडस्ट्रीत ऑडिशन देत होता. पण, त्याला कुठेही काम मिळत नव्हतं. पण, यादरम्यान आई-बाबांनी खंबीर साथ दिली म्हणूनच अमितला इंडस्ट्रीत पाऊल ठेवता आलं. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत ज्या-ज्या लोकांनी पाठिंबा दिला, अशा सगळ्या लोकांबद्दल अमित कायमच कृतज्ञता व्यक्त करत असतो.