‘ठरलं तर मग’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच अर्जुन सुभेदारवर हल्ला झाल्याचा सीक्वेन्स पाहायला मिळाला. यानंतर अर्जुनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्याची प्रकृती प्रचंड गंभीर असल्याचं मालिकेत पाहायला मिळालं. पण, यानंतर अर्जुनच्या पात्राचं पुढे काय होणार, तो पुढे मालिकेत दिसणार की नाही याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या. अर्जुन या पात्रावर प्रेक्षक इतकं प्रेम करतात हे पाहून, ही भूमिका साकारणारा अमित भानुशाली सुद्धा भारावून गेला होता. याबद्दल त्याने एक खास व्हिडीओ शेअर करत खुलासा केला आहे.

अमित भानुशाली म्हणाला, “नमस्कार, आज मी तुम्हाला काहीतरी सांगायला आलोय…कधी-कधी आम्हा कलाकारांनाही समजत नाही की, पडद्यावर साकारलेलं आमचं पात्र प्रेक्षकांच्या मनात इतक्या खोलवर पोहोचलंय. जेव्हा अर्जुन सुभेदारचा सीन तुम्ही पाहिलात..ज्यात अर्जुनला प्रचंड मारहाण करून, त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आलंय. त्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटलं की, आता अर्जुन आम्हाला परत शोमध्ये कधीच दिसणार नाही. मला तुम्ही सर्वांनी असंख्य मेसेज केलेत…मी तुमच्या कमेंट्सही वाचल्या. कित्येक कॉल्सही आले…तू खरंच या शोमध्ये नाहीयेस का आता? असंही लोकांनी विचारलं. काही लोकांनी कमेंट्समध्ये लिहिलं होतं..अर्जुन नसेल तर आम्ही मालिका बघणार नाही.”

अभिनेता पुढे सांगतो, “काही लोकांनी असेही मेसेज केले होते की, दादा तुझा तो सीन पाहून माझ्या आईने देवाजवळ प्रार्थना केली होती की, देवा.. माझ्या अर्जुनला काहीच होऊ देऊ नकोस. ‘माझ्या अर्जुन’ला हे शब्दच किती भावुक करणारे आहेत. हा तुमचा विश्वास खरंच खूप मोठा आहे…आणि या सगळ्या प्रतिक्रिया पाहून माझं मन भरून आलं होतं. तुमचं प्रेम, तुमची माया, तुमची आपुलकी…तुम्ही मला, या अर्जुन सुभेदारला तुमच्या घरातला एक सदस्य बनवलंत अजून काय हवं? या पात्राला तुम्ही खूप आपलंसं करून घेतलंय. याहून मोठा पुरस्कार माझ्यासाठी दुसरा कोणताच नाहीये. तुम्हा सर्वांचे खूप आभार…”

अर्जुन सुभेदार लवकरच कोर्टात एन्ट्री घेणार…

“आता ती वेळही लवकरच येणारे… कारण अर्जुन सुभेदार पुन्हा एकदा कोर्टात एन्ट्री घेईल आणि त्याचा दमदार आवाज संपूर्ण कोर्टात घुमेल. मी तुमचे जितके आभार मानेन…तितके कमीच आहेत. आता माझ्याकडे शब्दही नाहीयेत. अर्जुन सुभेदारला तुम्ही फक्त मालिकेतलं एक पात्र नाही, तर तुमच्या घरातला एक माणूस मानलंत… मी आयुष्यभर विसरणार नाही. मनापासून धन्यवाद!” अशा भावना अमित भानुशालीने व्यक्त केल्या आहेत.