KBC 18 Madhuri Dixit Amitabh Bachchan: बॉलीवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित लवकरच ‘कोण होणार करोडपती’ या मराठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. मात्र त्यापूर्वी तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती सीझन १८’च्या मंचावर हजेरी लावून चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं. माधुरीने हॉट सीटवर बसून बिग बींशी गप्पा मारल्या. सोनी टीव्हीने माधुरी आणि अमिताभ यांच्या खास एपिसोडचे दोन रंजक प्रोमो शेअर केले आहेत.
पहिल्या प्रोमोमध्ये, बिग बी माधुरीच्या ‘तेजाब’ चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘एक दो तीन’चे स्टेप्स कॉपी केल्याबद्दल तिची माफी मागताना दिसत आहेत. “माझ्याकडून एक मोठी चूक झाली होती. एक चित्रपट होता, ज्यात मी अशा प्रकारे ‘एक दो तीन’ केले होते,” असं सांगत अमिताभ यांनी तो डान्स कसा केला होता ते माधुरीला करून दाखवलं.
बिग बींच्या या म्हणण्यावर माधुरीने लगेच मिश्किलपणे प्रतिक्रिया दिली आणि तो व्हिडीओ सर्वांना दाखवायला हवा, असं सांगितलं. “मी दाखवू का?” असं तिने विचारलं. त्यानंतर पडद्यावर १९८९ मधील ‘तुफान’ चित्रपटातील एक क्लिप दाखवण्यात आली, ज्यामध्ये अमिताभ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत होते. व्हिडीओ संपताच प्रेक्षक आणि खुद्द अमिताभ बच्चन मोठ्याने हसू लागले.
पाहा अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ
दुसऱ्या प्रोमोमध्ये, माधुरी दीक्षितने ‘देवदास’मधील तिच्या चंद्रमुखी या पात्राची झलक दाखवली. ‘काहे छेड मोहे’ हे गाणं हॉट सीटवर बसल्या बसल्याच माधुरी डान्स करू लागली. तिचे हे सुंदर हावभाव पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. तर अमिताभ बच्चनही भारावून गेले. “क्या बात है! अप्रतिम, खूपच सुंदर माधुरीजी,” असं अमिताभ बच्चन म्हणाले.
