Amitabh Bachchan Eyesite : बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे वयाच्या ८३ व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने काम करत असतात. चित्रपट, मालिका आणि जाहिरातींमध्ये झळकणारे बिग बी हे अनेकदा संपूर्ण दिवस शूट करीत असतात. त्यांच्या सोनी टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ शोचा नवीन सीझन सुरू होणार आहे. यासाठी अमिताभ बच्चन यांनी शूटिंगला सुरुवात केली असून पहिल्यामध्ये त्यांनी पिवळा चश्मा का वापरतात, याचे कारण सांगितले. तसेच अमिताभ बच्चन यांना उतार वयामुळे डोळ्यांनी कमी दिसत असल्याचे सांगितले आहे.
अमिताभ बच्चन यांचा’ कौन बनेगा करोडपती’ हा शो येत्या १० ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामुळे शूटिंगला सुरुवात झाली असून अमिताभ बच्चन हे त्यांच्या खास अंदाजामध्ये शो होस्ट करणार आहेत. पहिल्या शूटिंगमध्ये त्यांना यायला उशीर झाल्याने त्यांनी प्रेक्षकांची आल्या आल्या हात जोडून माफी मागितली. यावर सर्व प्रेक्षकांनी अमिताभ बच्चन यांचे उत्साहाने स्वागत केले.
काय म्हणाले अमिताभ बच्चन?
सोनी टीव्हीने शेअर केलेल्या रीलमध्ये अमिताभ बच्चन म्हणाले की, “या नवीन सीझनच्या शूटिंगचा आज पहिलाच दिवस आहे, त्यामुळे खूप काही गोष्टी सेट करण्यामध्ये जरा वेळ गेला. यामध्ये एकजण मला म्हणाला, ‘सर तुमचा चष्मा चुकीचा आहे,’ यावर मी त्यांना म्हणालो, ‘चुकीचा चष्मा कसा काय? गेली २५ वर्षे तर हाच चष्मा वापरतोय.’ तर त्या व्यक्तीनं सांगितलं की, ‘सर तुमचा चष्मा फार पिवळा दिसतोय, त्याने जरा गडबड वाटतेय.”
माझे डोळे हे वृद्धावस्थामध्ये – अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांनी पुढे वयामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “मी त्या व्यक्तीला सांगितलं की, चष्म्यामध्ये मी जरा टिंट वापरलं आहे. कारण उतार वयात एखाद्या वृद्ध व्यक्तीचं वय हे त्याच्या डोळ्यांवरून लक्षात येतं आणि आता माझे डोळे हे वृद्धावस्थामध्ये पोहोचले आहेत; ते लपवण्यासाठी हा रंग वापरला आहे.”
बिग बी २४ तास करतात काम
अमिताभ बच्चन हे दररोज सोशल मीडियावर ब्लॉगदेखील लिहित असतात. यामध्ये त्यांनी नुकतेच २४ तास काम केल्याचा उल्लेख केला आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, “काल सकाळी ७ वाजता सुरू झालेलं काम आज सकाळी ७ वाजता पूर्ण झालं. ते काम वेळेवर पूर्ण होऊन सादर करणं खूप गरजेचं होतं, म्हणून ते पूर्ण केलं. त्यानंतर आता रोजच्या रूटीनचा ब्लॉग लिहून चाहत्यांशी बोलता आलं, याचं समाधान वाटतंय. आता थोडं जेवून काही वेळ विश्रांती घेणार आहे. कारण ६ ऑगस्ट रोजी पुन्हा पहाटेपासून काम सुरू होणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या पर्वाची तारीख जाहीर झाली आहे आणि त्या दिवशी मी गेलो नाही तर माझ्या जागी दुसऱ्या कोणाला तरी काम मिळेल.”
