Amitabh Bachchan Girlfriend funny Moment: बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन करीत आहेत. शोमध्ये ते अनेकदा स्पर्धकांशी गप्पा मारताना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील किस्सेही शेअर करतात. नुकतेच त्यांनी गर्लफ्रेंडला घरी आणण्याबाबत मजेशीर भाष्य केले. एवढ्या वर्षांमध्ये एकदाही गर्लफ्रेंडला घरी बोलावण्याची संधी न मिळाल्याचे वक्तव्य अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

‘कौन बनेगा करोडपती’चा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये अमिताभ बच्चन हे हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाशी संवाद साधत असतात. यावेळी बिग बी यांनी स्पर्धक अजय पुनिया यांची ओळख क्विझ मास्टर म्हणून करून दिली. त्यानंतर त्यांनी क्विझ तयार करून पैसे कमावता येतात यावर आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर कम्पॅनियन म्हणून बरोबर कोणाला आणले आहे, असे बिग बी यांनी विचारताच स्पर्धकाने गर्लफ्रेंडला आणल्याचे सांगितले.

गर्लफ्रेंडबद्दल काय म्हणाले अमिताभ बच्चन?

स्पर्धकाने बरोबर गर्लफ्रेंडला आणल्याचे सांगितल्यानंतर अमिताभ बच्चन थक्क झाले. त्यांनी आश्चर्य व्यक्त करीत स्पर्धकाकडे बघितल्याने सर्व प्रेक्षक हसू लागले. त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले, “मी आता ८४ वर्षांचा झालो आहे; पण आतापर्यंत एकदाही घरी असे बोलण्याची संधी मिळाली नाही. मी माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन आलोय, असे म्हणताच नाही आले.” अमिताभ बच्चन यांनी असे मिश्किल वक्तव्य करताच स्पर्धकासह सर्वजण एकसाथ जोरजोरात हसू लागले.

त्यावर स्पर्धकाची गर्लफ्रेंड तारिणी या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या असताना त्यांना अमिताभ बच्चन यांनी ‘हे बरोबर बोलत आहेत का,’ असा प्रश्न विचारला. त्यावर तारिणी यांनी ‘हे अगदी योग्य आहे,’ असे उत्तर देताच बिग बी म्हणाले, “तुम्ही तर असे म्हणू नका. कारण- तुम्हीच गर्लफ्रेंड आहात.”