Kaun Banega Crorepati 17 Winner : टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती १७’ आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. मात्र, ग्रँड फिनालेपूर्वीच या सीझनला दुसरा करोडपती मिळाला आहे. शोच्या अलीकडील भागात स्पर्धक बिप्लब बिस्वास यांनी अधिक रक्कम, तसंच एक आलिशान कारही जिंकली.
‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ फेरीत झारखंडमधील रांची येथील बिप्लब बिस्वास यांनी इतर स्पर्धकांना मागे टाकत हॉट सीटवर बसण्याची संधी मिळवली. खेळ सुरू होण्यापूर्वी त्यांनी बिग बींना आपुलकीने मिठी मारून अभिवादन केलं. मग त्यांनी आत्मविश्वासानं या खेळाला सुरुवात केली.
पुढे आपल्या ज्ञानाच्या जोरावर बिप्लब यांनी ५ लाख रुपयांपर्यंत एकही लाइफलाईन न वापरता सलग बरोबर उत्तरे दिली. एकही लाइफलाईन न वापरल्यानं ही संपूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली. त्यांच्या कामगिरीने प्रभावित होऊन अमिताभ बच्चन यांनी बिप्लब आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले.
यानंतर १२.५० लाख रुपयांच्या प्रश्नासाठी बिप्लब यांनी ‘ऑडियन्स पोल’ ही लाइफलाईन वापरून ‘गहाडवाला वंशातील कोणत्या राजाने चंदावर येथे घुरीदांविरुद्ध लढा दिला होता?’ याचे बरोबर उत्तर दिले. पुढे २५ लाखांच्या प्रश्नासाठी त्यांनी ‘संकेत सूचक’ लाइफलाईन वापरली आणि प्रशांत महासागरातील व्यक्तीच्या नावावर असलेला देश म्हणून किरीबाटी हे योग्य उत्तर निवडलं.
५० लाखांच्या प्रश्नासाठी त्यांनी ‘५०-५०’ या लाइफलाईनचा वापर करून भौतिकशास्त्रज्ञ वर्नर हायझेनबर्ग यांनी क्वांटम मेकॅनिक्सवरील महत्त्वाच्या संकल्पना ज्या बेटावर विकसित केल्या, ते हेल्गोलँड बेट असल्याचे ओळखले. त्यांनी जिंकलेली रक्कम जास्तीत जास्त लोकांच्या मदतीसाठी वापरण्याची इच्छा असल्याचेही सांगितलं.
बिप्लब बिस्वास बनले दुसरे करोडपती
पुढे त्यांना १ कोटी रुपयांसाठी ‘फ्रान्सहून अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी नेणाऱ्या जहाजाचे नाव काय होते?’ हा प्रश्न विचारण्यात आला. क्षणाचाही विलंब न करता बिप्लब यांनी या प्रश्नाचं ‘इसेरे’ हे अचूक उत्तर दिलं. त्यांचा आत्मविश्वास पाहून अमिताभ बच्चनही थक्क झाले.
या विजयासह बिप्लब बिस्वास ‘कौन बनेगा करोडपती १७’चे दुसरे करोडपती ठरले आहेत. त्यांनी १ कोटी रुपये आणि एक कार जिंकली असून आता ते ७ कोटींच्या अंतिम बक्षिसासाठी रोलओव्हर स्पर्धक म्हणून पुन्हा खेळणार आहेत.
बिप्लब बिस्वास काय काम करतात?
बिप्लब बिस्वास हे सीआरपीएफमध्ये इन्स्पेक्टर असून सध्या छत्तीसगडमधील बीजापूर येथे कार्यरत आहेत. खेळ सुरू होण्याआधी त्यांनी जंगल भागात देशसेवा करताना सुरक्षा दलांना भेडसावणाऱ्या कठीण परिस्थिती, त्याग आणि आव्हानांबद्दल सांगितले. त्यांचे बोलणे ऐकून अमिताभ बच्चनही भावुक झाले.
