अमिताभ बच्चन लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १८व्या सीझनच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पुन्हा परतले आहेत. गेल्या सुमारे २५ वर्षांपासून ते या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. शोदरम्यान अमिताभ बच्चन अनेकदा स्पर्धकांशी संवाद साधत त्यांच्या आयुष्यातील अनुभवांबद्दलही जाणून घेतात.
अमिताभ बच्चन अनेकदा शोमध्ये त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास आणि भावनिक क्षणांबद्दलही सांगत असतात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच अभिनय कारकिर्दीबद्दलही मोकळेपणाने बोलतात. मात्र, प्रत्येक क्षण हलकाफुलका किंवा विनोदीच असेल असं नाही. काही स्पर्धक आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणी आणि आव्हानांबद्दलही अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधतात. अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोड़पती’चा सूत्रसंचालक म्हणून काम करतानाचा आपला अनुभव शेअर केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी सांगितला अनुभव
अमिताभ बच्चन यांनी आपल्या अलीकडील Tumblr पोस्टमध्ये लिहिलं, “काही स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील इतक्या गंभीर आणि दुःखद वैयक्तिक कहाण्या घेऊन येतात की, त्यांच्या भावना समजून घेणं आणि त्यांच्याबरोबर भावनिकरित्या जोडलेलं राहणं तर कठीण होतंच; पण त्यानंतर शोचं सूत्रसंचालन सुरू ठेवणंसुद्धा अवघड होतं.”
ते पुढे म्हणाले, “याबद्दल मी अधिक काही सांगणार नाही, कारण त्यामुळे चॅनेलला एका सूत्रसंचालकाकडून अपेक्षित असलेल्या काही गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. पण हा अनुभव मन हेलावून टाकणारा होता,” अशी कबुली त्यांनी दिली.
अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्कि २८९८ एडी’चा सीक्वल आहे. या चित्रपटात प्रभास आणि कमल हासन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. पहिल्या भागाने जगभरात १,००० कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्यानंतर आता या चित्रपटाच्या सीक्वलचं शूटिंग आणि निर्मितीचं काम सुरू आहे.
अमिताभ बच्चन अनेकदा कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. अलीकडेच केबीसीमध्ये अक्षय कुमार व सैफ अली खान सहभागी झाले होते. त्यावेळी तिघांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. अमिताभ बच्चन यांनी दोघांशीही गंमतीशीर संवाद साधत त्यांची पोलखोलही केली.
दरम्यान, अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही खूप सक्रीय असतात. अनेकदा ते यामार्फत समाजात घडणाऱ्या घडामोडींबद्दलची त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.
