बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालनच करताना स्पर्धकांशी मनमोकळ्या गप्पा मारतात. तसेच आपल्या आयुष्यातील किस्से सांगतात आणि स्पर्धकांच्या गोष्टीही ऐकून घेतात. ताज्या भागात, अलमास खान हिने अमिताभ बच्चन यांना सांगितलं की, ती त्यांचा चित्रपट पाहताना झोपली होती. त्यावर बिग बींनी दिलेली मजेशीर चर्चेत आहे.

जयपूर येथील अलमास खानने आपल्या बालपणीची आठवण सांगितली. ती म्हणाली की, तिला अमिताभ बच्चन यांचे चित्रपट खूप आवडतात. बालपणापासून ती त्यांचे चित्रपट पाहतेय. अलमासने जयपूरमधील प्रसिद्ध ‘राज मंदिर’ टॉकीजमध्ये अमिताभ यांचा १९९७ मधील ‘मृत्युदाता’ चित्रपट पाहिला होतो. ती लहान असताना भावंडांबरोबर तो चित्रपट पाहायला गेली होती. मात्र, राज मंदिर थिएटर खूप सुंदर आणि कंफर्टेबल असल्याने चित्रपट चालू असतानाच तिला झोप लागली होती.

थिएटरमध्ये झोपली होती अलमास खान

अलमास बिग बींना म्हणाली, “मला चित्रपट तर फारसा समजला नाही. पण ते थिएटर खूप सुंदर होते आणि तिथे एसी चालू असल्यामुळे मला छान झोप लागली. सर, खरं सांगते, जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा चित्रपट संपला होता आणि पडद्यावर तुमचं गाणं सुरू होतं.”

अमिताभ बच्चन म्हणाले, “तुम्ही काय पाहिलं?”

त्यानंतर ती पुढे म्हणाली की, ‘मृत्युदाता’ हाच अमिताभ यांचा असा पहिला चित्रपट होता जो तिने मोठ्या पडद्यावर पाहिल्याचं तिला अजूनही आठवतं. हे ऐकून सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी थोडं नाराज झाल्याची गंमत केली. मग त्यांनी लगेचच आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ते हसत म्हणाले, “जरा थांबा, झोपता झोपता तुम्ही चित्रपट कसा पाहिला? चित्रपट तर संपला होता, मग नक्की तुम्ही काय पाहिलं?”

‘मृत्युदाता’ या ॲक्शन-ड्रामा चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. मेहुल कुमार दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी डॉ. राम प्रसाद यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, अरबाज अली खान आणि परेश रावल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. पण बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकला नव्हता.