Amjad Khan son on Salim Khan and Amitabh Bachchan: ‘शोले’मधील गब्बर आठवतोय? ही भूमिका दिवंगत अभिनेते अमजद खान यांनी साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली. सुरुवातीला या भूमिकेसाठी डॅनी डेंग्झोपा यांची निवड झाली होती. मात्र, शूटिंगच्या तारखांच्या समस्यांमुळे त्यांनी ही भूमिका सोडली. त्यानंतर सलीम खान व जावेद अख्तर यांनी अमजाद खान यांचे गब्बर या भूमिकेसाठी नाव सुचवले होते.
आता अमजद खान यांचा मुलगा शादाब खानने एका मुलाखतीत नात्यांबद्दल, तसेच वडिलांचे निधन झाले होते, तेव्हा सलीम खान यांनी सर्व विधी पूर्ण केले होते, असा खुलासा केला. शादाबने नुकतीच विकी लालवानीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्या वडिलांच्या निधनापूर्वी त्यांच्यात आणि सलीम साहेबांमध्ये काय घडले हे मला माहीत नाही. पण, त्यांच्या निधनानंतर घरात पूर्ण गोंधळ उडाला होता. लोकांची सतत ये-जा सुरू होती, विधी सुरू होते. माझी आई काहीही सांभाळण्याच्या स्थितीत नव्हती. मी फक्त १८ वर्षांचा होतो आणि माझी भावंडं खूप लहान होती.”
“स्वतःच्या खिशातून सर्व खर्च…”
शादाब पुढे म्हणाला, “त्या वेळी आम्हाला धार्मिक विधी आणि रीतीरिवाजांसाठी अनेक गोष्टींची गरज होती. एक गोष्ट मला स्पष्टपणे आठवते की, सलीमसाहेब ही एक अशी व्यक्ती होते, जे गुपचूपपणे स्वतःच्या खिशातून सर्व खर्च करीत होते. धार्मिक विधींसाठी जे काही लागत असे, त्याचे पैसे ते कोणालाही न सांगता किंवा कोणाचेही लक्ष वेधून न घेता, गुपचूप देत असत. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.”
शादाब असेही म्हणाला, “माझे वडील वारले होते. त्यावेळी माझी स्वत:ची अशी वेगळी ओळख नव्हती. सलीम खान आधीच एक दिग्गज होते आणि सलमान खान एक सुपरस्टार होता. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावून मला धीर दिला, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यांना तसे करण्याची गरज नव्हती. पूर्वी वडिलांबरोबर काही कटुता असली तरी त्यांचा असा विश्वास होता की, एकदा एखादी व्यक्ती गेली की, त्याच्याबरोबर त्या समस्याही संपतात. असा विचार करण्यासाठी खूप मोठे मन लागते.”
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल शादाब म्हणाला, “बच्चनसाहेब त्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत, ज्यांनी त्यांचा दृष्टिकोन कधीही न बदलता, वर्षानुवर्षे संबंध टिकवून ठेवले आहेत. ते माझ्या पुस्तक प्रकाशनालासुद्धा आले होते.”
अमिताभ बच्चन यांची आणखी एक आठवण सांगत शादाब म्हणाला, ” ‘द ग्रेट गॅम्बलर’च्या शूटिंगसाठी गोव्याला गेलो असताना आमच्या गाडीचा अपघात झाला. माझे वडील, मी आणि आई आम्ही तिघेही गंभीर जखमी झालो. माझे वडील मरता मरता वाचले, माझी आई गंभीर जखमी झाली आणि माझे कॉलरबोन फ्रॅक्चर झाले. आम्हाला गोव्यातील एका रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी बच्चनसाहेबांनी खूप मदत केली होती.”
‘शोले’मधील गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी मूलतः डॅनी डेन्झोंग्पाला करारबद्ध करण्यात आले होते; परंतु धर्मात्मा या चित्रपटाच्या तारखा जुळत नसल्यामुळे त्याने हा चित्रपट सोडला. त्यानंतर लेखक सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी या भूमिकेसाठी अमजद खानच्या नावाची शिफारस केली.
अमजद खान आणि सलीम-जावेद यांच्यात काय घडले होते?
काही रिपोर्टनुसार, जेव्हा ‘शोले’मध्ये अमजद खान यांची निवड झाली, तेव्हा ते नवीन होते. घाबरल्यामुळे ते गब्बर ही भूमिका उत्तमपणे साकारू शकले नाहीत. त्यामुळे शोलेचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी गब्बरचे शूटिंग थांबवले. त्यानंतर जर कास्टिंगबद्दल खात्री नसेल, तर त्याला बदलून दुसऱ्याला घेण्याचा सल्ला सलीम-जावेद यांनी रमेश सिप्पींना दिला होता.
रमेश सिप्पींनी अमजदला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अमजद खान आत्मविश्वासाने परतले. त्यांनी गब्बर ही भूमिका इतक्या उत्तम रीतीने साकारली की, हिंदी सिनेसृष्टीतील अविस्मरणीय खलनायकांपैकी एक ठरली. मात्र, जेव्हा अमजद यांना समजले की, सलीम-जावेद यांनी त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी घेण्याचा सल्ला दिला होता, तेव्हा त्यांन खूप दुःख झाले. ‘शोले’च्या यशानंतरही त्याने त्या लेखक जोडीबरोबर पुन्हा कधीही काम केले नाही.
