१४ जूनला ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेचा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर शेवट करण्यात आला. मात्र, मालिका वाहिनीवरून संपली असली तरीही, ही गोष्ट संपणार नाहीये…प्रेक्षकांना या मालिकेची गोष्ट एका नव्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल, असं डॉ. अमोल कोल्हे यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्यानुसार आता ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका २० जूनपासून सायंकाळी ६:३० वाजता प्रेक्षकांना ‘मराठी वारसा’ या युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेचा नवीन प्रोमो काही नुकताच डॉ. अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये एक मोठा बदल प्रेक्षकांना पाहायला मिळाला, हा बदल म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या मालिकेत सावित्रीबाईंची भूमिका साकारत होती. मात्र, वाहिनीवरून मालिका संपल्यावर तिनेही या भूमिकेचा निरोप घेतला आहे. आता मधुराणीच्या ऐवजी लोकप्रिय अभिनेत्री क्षमा देशपांडे सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहे.

मधुराणी मालिका का सोडली यासंदर्भात सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच चर्चा सुरू होत्या. अखेर डॉ. अमोल कोल्हेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत खुलासा केला आहे. तसेच प्रोमो पाहून मधुराणीने या मालिकेच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “आपण आता ही मालिका युट्यूब चॅनेलवर प्रसारित करणार आहोत. हा निर्णय घेतल्यावर आम्ही सगळ्या कलाकारांशी मोकळेपणाने संवाद साधला. प्रत्येकाच्या वेगळ्या अडचणी असू शकतात…मला प्रोमो पाहिल्यावर मधुराणीने मेसेज केला होता. तिला प्रोमो प्रचंड आवडला आणि तिने क्षमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य होतं की, तुम्ही या प्रोजेक्टचा भाग होऊ इच्छिता की नाही. खरंतर, मधुराणी एका वाहिनीचा फेस आहे…त्यामुळे हा निर्णय घेत असताना तिच्यासमोर इतर बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणूनच तिने आम्हाला सांगितलं की, या मालिकेसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर मग आम्ही सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीचा शोध सुरू केला.”

दरम्यान, क्षमा देशपांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर यापूर्वी ती ‘स्टार प्रवाह’च्या ‘उदे गं अंबे’ या मालिकेत झळकली आहे. याशिवाय तिने ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या ‘इंद्रायणी’ मालिकेत सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारली आहे. नुकतीच तिने ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत एन्ट्री घेतली होती. आता क्षमा प्रेक्षकांना सावित्रीबाईंच्या भूमिकेत झळकताना दिसणार आहे.