अमृता व अभिषेक देशमुख या बहीण-भावाची जोडी मराठी इंडस्ट्रीत चांगलीच लोकप्रिय आहे. अभिषेक देशमुख ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाला. तर अमृता सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सईची भूमिका साकारताना दिसतेय. वैयक्तिक आयुष्यात अमृताने अभिनेता प्रसाद जवादेशी लग्न केलं आहे. तर, अभिषेकची पत्नी कृतिका सुद्धा अभिनेत्री आहे. कृतिका देव सध्या ‘स्टार प्रवाह’च्या ‘लपंडाव’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.

अमृता-प्रसाद आणि अभिषेक-कृतिका यांनी एकत्र मिळून नुकताच त्यांच्या आईचा ६० वा वाढदिवस साजरा केला. या चौघांनी मिळून वैशाली देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त खास सरप्राइज पार्टीचं आयोजन केलं होतं. वैशाली देशमुखांना लेक अमृता व सूनबाई कृतिका या दोघींनी नियोजित स्थळी आणलं. यानंतर त्यांच्यावर फुलांची उधळण करून वैशाली यांना वाढदिवसाचं हे गोड सरप्राइज देण्यात आलं.

वैशाली देशमुख यांचे जुने फोटो, त्यांचे कुटुंबीयांबरोबरचे गोड फोटो या सगळ्या फोटोंचा एकत्र कोलाज करून खूप सुंदर सजावट करण्यात आली होती. त्यांचा ६० वा वाढदिवस असल्याने ताटात दिव्यांची आरास करून वैशाली यांचं औक्षण करण्यात आलं.

याशिवाय आईसाठी या मुलांनी खास चित्रफीत सुद्धा बनवली होती. हा व्हिडीओ पाहून वैशाली यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या जवळच्या मैत्रिणी सुद्धा या खास पार्टीला उपस्थित होत्या.

अमृता हा सुंदर व्हिडीओ शेअर करत लिहिते, “आईच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त तिला एक खास Surprise दिलं आणि आमच्यासाठी ही एक सुंदर संध्याकाळ ठरली. वैशाली देशमुख…चौकट मोडून स्वतःचा मार्ग तयार करणारी, घर सांभाळून स्वतःलाही जपणारी…आमची १९६६ ची लिमिटेड एडिशन! Happy Birthday Aai ( १९ जानेवारी २०२६ )”

दरम्यान, अमृताने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “किती गोड साजरा केला वाढदिवस”, “सुंदर व्हिडीओ”, “कायम सगळे असेच आनंदी राहा…वाढदिवस सुंदर साजरा केला”, “काकूंना ६० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.