Amruta Deshmukh on Lakshmi Niwas: ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका प्रचंड गाजत आहे. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. मालिकेतील लक्ष्मी व श्रीनिवास त्यांच्या कुटुंबाला जोडून ठेवण्यासाठी, त्यांना आनंदी ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात.
मालिकेतील भावना, जान्हवी, मंगल, संतोष, हरीश, व्येंकी, आरती, आनंदी, सिद्धू, जयंत, विश्वा ही सर्वच पात्रे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. जान्हवी व विश्वाची मैत्री सर्वांना आवडते. कॉलेजला असताना विश्वा जान्हवीच्या प्रेमात पडला होता. मात्र, त्याने तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्याआधीच जान्हवीने तिचे लग्न जयंतबरोबर ठरल्याचे सांगितले.
जान्हवी आयुष्यातून गेल्यानंतर विश्वा एकटा पडला होता. दु:खात बुडाला होता. त्यानंतर त्याच्या आयुष्यात सई आली. तिने विश्वाला समजून घेतले, त्याच्याशी मैत्री कऱण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी सई व विश्वाचे लग्न ठरवले. जेव्हा जान्हवी तनुजा हे नाव घेऊन विश्वाच्या घरात राहत होती, त्यावेळीसुद्धा सईने तिच्याशी चांगली मैत्री केली होती.
मालिकेतील सई ही भूमिका अभिनेत्री अमृता देशमुखने साकारली होती. या भूमिकेतून सईला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. आता अमृताने एका मुलाखतीत या भूमिकेबद्दल आणि मालिकेबद्दल वक्तव्य केले आहे.
“लक्ष्मी निवासमध्ये मी भूमिका…”
अमृताने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “लक्ष्मी निवासमध्ये मी भूमिका साकारली, तेव्हा प्रसाद साशंक होता. ती भूमिका तू खरंच साकारणार आहेस का असे तो मला म्हणत असे. कारण- मालिकेतील प्रमुख कुटुंबातील ती भूमिका नव्हती. एका वेगळ्या कुटुंबात मी होते. पण, मला वाटलं की ती भूमिका साकारायला हवी. मालिका छान आहे, टीम छान आहे आणि समोरून त्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली होती. इतर कोणी नाही म्हणून ते मला भूमिकेसाठी विचारत नव्हते. मला खरंच वाटलं की त्या भूमिकेसाठी मी त्यांना हवी आहे. ती भूमिका छान होती. मला नाटकाच्या ठिकाणी येऊन लोक त्या भूमिकेबद्दल बोलतात. चांगलं काम केलं की लोकांपर्यंत पोहोचतंच.”
याच मुलाखतीत अमृताने तिच्या करिअरमधील विविध अनुभवांबद्दल वक्तव्य केले. विविध मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभव, सेटवर मिळालेली वागणूक, रिजेक्शन आणि इंडस्ट्रीतील राजकारण याबद्दल वक्तव्य केले. तसेच, तिने तिच्या सासूच्या म्हणजेच प्रसादच्या आईच्या आठवणीदेखील सांगितल्या.
अमृता ‘नियम व अटी लागू’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. या नाटकात तिच्यासह संकर्षण कऱ्हाडे प्रमुख भूमिकेत आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते. याबरोबरच, अमृता सोशल मीडियावरही सक्रिय असते. आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
