Zee Chitra Gaurav 2026 Awards Amruta Subhash Post : मराठी मनोरंजनसृष्टीत मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावर्षी ‘आता थांबायचं नाय!’, ‘गुलकंद’, ‘जारण’, ‘उत्तर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये पुरस्कार जिंकण्यासाठी चुरस रंगली होती. यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री हे मानाचे पुरस्कार कोण जिंकणार याकडे संपूर्ण मराठी कलाविश्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर या विजेत्यांची नावं आता समोर आली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यंदा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार दिलीप प्रभावळकर व भरत जाधव यांना प्रदान करण्यात आला आहे. अनुक्रमे ‘दशावतार’ आणि ‘आता थांबायचं नाय!’ या पुरस्कारांसाठी या दोन्ही दिग्गज कलावंतांचा गौरव करण्यात आला आहे.
पुरस्कार जिंकल्यावर अमृता सुभाष, भरत जाधव आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी एकत्र सेल्फी फोटो काढला. यासह अभिनेत्रीने या दोन्ही दमदार कलाकारांसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
अमृता लिहिते, “माझ्यासाठी दिलीप काका आणि भरत हे दोघं केवळ भारतातील उत्कृष्ट अभिनेतेच नाहीत, तर मला भेटलेली दोन अतिशय निर्व्याज माणसं आहेत. काही माणसं जिंकण्याला सुंदर बनवतात… काही माणसं नेहमी जिंकावीत असं वाटतं, तशी माणसं आहेत ही दोघं माझ्यासाठी… त्या दोघांनीही माझ्या आईबरोबर काम केलं आहे, दोघांनीही मला लहानपणापासून पाहिलं आहे. हे दोघं सर्वोत्तम अभिनेते ठरले असताना त्यांच्याबरोबर मिळालेलं हे सर्वोत्तम अभिनेत्रीचं बक्षिस मला किती आनंद देऊन गेलं हे शब्दात कसं मांडू? झी मराठीचे, परीक्षकांचे आणि जारण टीमचे आभार आणि कृतज्ञता!”
अमृताने पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. छाया कदम, ऋतुजा बागवे, अश्विनी कासार, मानसी नाईक, आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, पर्ण पेठे, अमृता खानविलकर, मयुरी देशमुख यांसह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत या तिन्ही कलाकारांचं कौतुक केलं आहे.

