Anandi Serial Actress Jaaee Khandekar Diet : अलीकडच्या काळात मालिकांचं शूटिंग १२ तासांहून अधिक वेळ सुरू असतं. अशा परिस्थितीत कलाकारांना आपला फिटनेस जपणं खूपच महत्त्वाचं असतं. अनेक कलाकार जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळतात, तर काहींनी आहारातून काही पदार्थ कायमचे बंद केले आहेत. आता ३० मार्चपासून छोट्या पडद्यावर आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री होतेय. या अभिनेत्रीचं नाव आहे जाई खांडेकर.
जाई ‘आनंदी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या शूटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. सध्या जाई सेटवर आपला फिटनेस कसा जपतेय, तिच्या आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असतो जाणून घेऊयात. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आनंदी म्हणजेच जाई खांडेकरने दुधाच्या पदार्थांचं सेवन बंद केलं आहे. चीझ वगैरे तिला प्रचंड आवडतं पण, तरीही आता जाई हे पदार्थ खाणं टाळते.
जाई राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगते, “जे काही सीझनल पदार्थ आहेत…ते खाण्याकडे माझा कल असतो. आता अजून आंबे बाजारात आलेले नाहीयेत. एकदा आंबे आले की, मी पुऱ्या-आमरस खायला सुरुवात करणार. माझा रोजचा डबा मला माझी आई बनवून देते. खरंतर माझी आई वर्किंग वुमन आहे. पण, तरीही ती सगळं माझ्यासाठी बनवते. कारण, मी सीझनल पदार्थ खाल्ले पाहिजेत असं माझ्या आईला खूप वाटतं. आता मी सेटवर संध्याकाळी ७ वाजता डिनर करते. त्यानंतर थेट दुसऱ्यादिवशी सकाळी मी ब्रेकफास्ट करते. यामुळे माझं १२ तासांचं इंटरमिटेंट फास्टिंग पूर्ण होतं.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी सेटवर असल्याने अगदी योग्य वेळेत जेवण, वेळ झाली की नाश्ता…या सगळ्याकडे माझं विशेष लक्ष असतं. आमच्यासाठी एक गोष्ट चांगलीये ती म्हणजे अरुण सरांबरोबर आम्ही काम करतोय. त्यांच्या घरून त्यांच्या मिसेस सुद्धा खूप छान जेवण बनवून पाठवतात. त्यामुळे सेटवरचा लंच ब्रेक आमच्यासाठी खूप आनंददायी असतो.”
वरण-भात माझं कंफर्ट फूड
“मला Continental पदार्थ बनवायला येतात, खायला आवडतात. पण, माझ्या आईचं असं म्हणणं होतं की, तुला भाकऱ्या-चपाती बनवायला आलं पाहिजे. मी करोना काळात भाकऱ्या बनवायला शिकले. वरण-भात, तूप, लिंबू मी आयुष्यभर खाऊ शकते. माझ्या डिनरमध्ये सुद्धा याचाच समावेश असतो. मी आईला सांगून ठेवलंय…लंचला तू मला एवढं सगळं देत असशील. तर डिनर एकदम साधा दे… वरण-भात इतकंच मला खूप आवडतं.”
“आमच्या सेटवर आलापिनी ( अभिनेत्री ) शुगरचं काहीच खात नाही…आता हळुहळू ही सवय मला सुद्धा होणार आहे. मी सुद्धा आता आहारात साखरेचं प्रमाण कमी केलं आहे.” असं जाई खांडेकरने सांगितलं.
