scorecardresearch

“इंडस्ट्रीत १२ वर्षे मेहनत करूनही काम मिळत नाहीये” सुपरहिट चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, पोस्ट चर्चेत

“दररोज लोक मला विचारतात…” अभिनेत्रीने पोस्ट करत काम मिळत नसल्याची केली तक्रार

“इंडस्ट्रीत १२ वर्षे मेहनत करूनही काम मिळत नाहीये” सुपरहिट चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, पोस्ट चर्चेत
(फोटो – इन्स्टाग्रामवरून साभार)

अनेक टीव्ही मालिका आणि प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आंचल सिंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. आपल्याकडे गेल्या ६ महिन्यांपासून काम नाही, अशी व्यथा तिने सोशल मीडियावर मांडली आहे. इंडस्ट्रीला १२ वर्षे दिल्यानंतरही घरी बसून राहावं लागतंय, असं आंचलने म्हटलंय. तिने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.

आंचलने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “दररोज लोक मला विचारतात की मी काय करते आहे किंवा मी राउंडटेबल्सचा भाग का नाही किंवा मला माझ्या कामासाठी नामांकित का केलं जात नाही? ज्यांना या सगळ्यामध्ये रस आहे, त्यांच्यासाठी- १. गेल्या सहा महिन्यांपासून मला जास्तीत जास्त २ वगळता कोणत्याही चित्रपट किंवा वेब सीरिजसाठी ऑडिशन देण्यास बोलावण्यात आलं नाही. मी फोन करून चौकशी केली तेव्हा मला सांगण्यात आले की सध्या कोणतेही काम होत नाहीये. २ मुद्दा – मी माझ्या आयुष्यातील १२ वर्षे इंडस्ट्रीला दिली आहेत आणि ४०० टीव्ही जाहिराती केल्या आहेत. मी पंजाबी, तमिळ आणि श्रीलंकन ​​चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशातच, मी स्वतःहून काही चित्रपट सोडले. मी ‘अनदेखी’ नावाची वेब सीरिज केली. पण २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये काली काली आंखे’ मुळे मला खरी ओळख मिळाली. हा एक प्रोजेक्ट होता जो मला खूप आवडला होता. या प्रोजेक्टने मला ओळख मिळवून दिली, त्यासाठी मी कायम आभारी असेन. ३. शेवटचा मुद्दा. सत्य कडू असतं. पण एवढं करूनही मी घरी बसून आहे. माझ्याकडे काम नाही. या गोष्टीचा मला त्रास होतो आणि मी निराश होते. वर्षाचा शेवट आहे आणि मी माझ्या कुटुंबासोबत खऱ्या प्रेमाचा आनंद घेत आहे,” असं आंचलने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

आंचल सिंगने अनेक टीव्ही जाहिरातींसाठी काम केले आहे. तिला श्रीलंकन ​​चित्रपट ‘श्री सिद्धार्थ गौतम’ मधून मोठा ब्रेक मिळाला होता, त्यामध्ये तिने राजकुमारी यशोधरा ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट २० देशांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि श्रीलंकेच्या बॉक्स ऑफिस इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 18:16 IST

संबंधित बातम्या