Anil Kapoor celebrates 53 years of togetherness with wife: अनिल कपूर आजही विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. याबरोबरच, ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील अनेकदा चर्चेत येतात. नुकतीच त्यांच्या लग्नाला ४२ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने अनिल कपूर यांनी पत्नी सुनीता कपूर यांच्याबरोबरचे अनसीन फोटो शेअर केले.
अनिल कपूर यांनी काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो शेअर करताना त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले, “४२ वर्षांचे लग्न आणि ५३ वर्षांचा सहवास… पण प्रत्येक वर्ष मागच्या वर्षापेक्षा अधिक सुंदर वाटते. आमचे लग्न अगदी साधेपणाने, फक्त ३० मिनिटांत झाले होते. ना हनिमून, ना मोठा सोहळा झाला. आमच्या दोघासंह फक्त आमचे आई-वडील, काही जवळचे लोक होते. त्या ३० मिनिटांचे नाते ५३ वर्षांपर्यंत जाईल, असे कधी वाटले नव्हते.”
पुढे त्यांनी लिहिले, “असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या हातात. आमची गाठ नक्कीच स्वर्गात बांधली गेली आहे. मी आधीही म्हणालो आहे आणि या पुढेही म्हणत राहीन की तुझ्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सुरू आहेत. मी माझी स्वप्ने पूर्ण केली, काही धोके पत्करले कारण मला माहित होते की तू सगळं सांभाळत आहेस. गेल्या ५३ वर्षांपासून तू मला निवडतेस, त्यासाठी खूप धन्यवाद”, असे म्हणत अनिल कपूर यांनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
अनिल कपूर वेळोवेळी पत्नीचे कौतुक करतात. सुनीता कपूर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की सुनीता माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आहे. मी कामात व्यग्र असताना सुनीताने माझ्या आईची काळजी घेतली आणि संपूर्ण घर सांभाळले.
अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या प्रेमकहाणीचीसुद्धा वेळोवेळी चर्चा होते. १९७३ मध्ये अनिल कपूर करिअरमध्ये संघर्ष करत होते. त्यावेळी सुनीता मॉडेल म्हणून काम करत होत्या. त्या लोकप्रिय होत्या. सुनीता यांना एका मित्राने अनिल कपूर यांना प्रँक कॉल करण्यास सांगितले. तिथून त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली. अनिल कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचा आवाज ऐकताच मी तिच्या प्रेमात पडलो.
लग्नाआधी दोघांनी जवळपास १०-११ वर्षे एकमेकांना डेट केले. अनिल कपूर यांनी पहिला चित्रपट साइन केल्यानंतर सुनीताला लग्नासाठी प्रपोज केले आणि दुसऱ्याच दिवशी दोघांनी लग्न केले. लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांनी अनिल पुन्हा शूटिंगला गेले.
अनिल कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा मी सुनीताला भेटलो तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. ती अनेक गोष्टी सांभाळायची. अनेकदा ती हॉटेलचे बिल माझ्या नकळत भरायची. आमच्या नात्यात तिने खूप मोठा त्याग केला.”
अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये अनिल कपूर यांनी कबूल केलेले की, करिअरमुळे ते मुलांना पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत. जवळपास सिंगल पॅरेंटसारखी मुलांची जबाबदारी सुनीताने एकटीने सांभाळली. मी होतो, पण एका वडिलांनी जसा मुलांना वेळ द्यायला हवा तसा देऊ शकलो नाही.
२०२३ मध्येही अनिल कपूर यांनी पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, ५० वर्षांपूर्वी सुरू झालेली आपली प्रेमकहाणी आयुष्यभर अशीच कायम राहो. आपल्या लग्नाला ३९ वर्षे झाली,त्याआधी आपण ११ वर्षे एकमेकांना डेट केले. या सगळ्यात तू इतका संयम कसा ठेवलास, हे मला अजून समजले नाही.
अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांना सोनम, रिया व हर्षवर्धन कपूर ही तीन मुले आहेत. सोनम व हर्षवर्धन हे अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. तर रियाने फॅशन डिझायनर व निर्माती म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
