‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘पारू’ या ‘झी मराठी’च्या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या मालिका ऑफ एअर झाल्या असल्या तरी त्यांची क्रेझ जराही कमी झालेली नाहीये. सध्या या दोन्ही मालिका दक्षिण आफ्रिकेत तिथल्या स्थानिक ‘इसिजुलू’ (IsiZulu) भाषेत डब करून प्रसारित केल्या जात आहेत. यामुळे आपल्या मराठी कलाकारांचा आफ्रिकेत सुद्धा एक चाहतावर्ग तयार झाला आहे. नुकतीच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री अनिता दातेने यासंदर्भात खास पोस्ट शेअर केली आहे.
अनिता दाते तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “जेव्हा एखादी कथा, भाषा संस्कृतीच्या सीमा ओलांडून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने सर्वांचीच होऊन जाते. मी नुकतीच जोहान्सबर्ग आणि डर्बनला भेट देऊन दक्षिण आफ्रिकेतून परतले! या प्रवासाचं निमित्त होतं आमच्या अत्यंत जवळची मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको!’ खरंतर, आम्ही या मालिकेचा प्रवास १० वर्षांपूर्वी सुरू केला होता. याचा पहिला भाग २२ ऑगस्ट २०१६ रोजी प्रसारित झाला होता. यानंतर जवळपास साडेचार वर्षे ही मालिका सुरू होती. यादरम्यान आम्ही मालिकेचे १३५० हून अधिक भाग पूर्ण केले. झी मराठीसह झी चित्रमंदिर, झी टॉकीज आणि झी हिंदी अशा विविध वाहिन्यांवर ही मालिका प्रसारित केली गेली. पण, मला सर्वात जास्त आनंद तेव्हा झाला, जेव्हा मला समजलं की, ही मालिका दक्षिण आफ्रिकेत तिथल्या स्थानिक ‘इसिजुलू’ (IsiZulu) भाषेत डब करून प्रसारित केली जातेय आणि तिचं पुनःप्रसारण अजूनही सुरू आहे. याचबरोबर ‘पारू’ मालिका सुद्धा ‘झी झोंके’, ‘झी वन’ आणि ‘झी वर्ल्ड’ सारख्या वाहिन्यांवर प्रसारित होत आहे.”
“दक्षिण आफ्रिकेतील प्रेक्षकांपर्यंत आपल्या मालिका पोहोचणं हा खरंच स्वप्नवत अनुभव आहे. आमच्या परदेशातील या चाहत्यांना भेटण्यासाठी मी, अभिजीत खांडकेकर आणि शरयू सोनावणे आम्ही तिघंही आफ्रिकेला गेलो होतो. हा अनुभव खूपच सुंदर होता. यामुळे मला जाणी झाली की, एखादी कथा कधीच फक्त आपल्या एकट्याची नसते, ती एकाचवेळी असंख्य लोकांना जोडून ठेवते. ज्या सगळ्यांमुळे हे शक्य झालं…त्या प्रत्येकाचे मी आभार मानते. आमचे दिग्दर्शक आणि क्रिएटिव्ह टीमचेही आभार. प्रेम अन् कृतज्ञतेने भरलेलं मन घेऊन मी घरी परतले आहे.” असं अनिता दातेने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अनिताने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांसह तिच्या सहकलाकारांनी सुद्धा कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता अनिता पुन्हा कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
