Anjali Anand on what YRF’s casting director told her: अभिनेत्री अंजली आनंद हिंदी मालिका, वेब सीरिज आणि सिनेमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अंजलीच्या आई-वडिलांनी अभिनय क्षेत्रात काम केले आहे. अंजलीने अभिनय आणि डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे. पण, असे असले तरी काम मिळवण्यासाठी अभिनेत्रीला संघर्ष करावा लागला. एक काळ असाही आला होता, जेव्हा अंजलीने अभिनय सोडण्याता निर्णय घेतला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला होता.
अभिनेत्रीला कास्टिंग डायरेक्टरने दिलेला सल्ला
फराह खान नुकतीच तिचा कूक दिलीपसह अंजली आनंदच्या घरी पोहोचली होती. यावेळी त्यांनी पदार्थ बनवण्याबरोबरच गप्पाही मारल्या. यावेळी अंजलीने वाढलेल्या वजनामुळे तिला काम मिळालं नाही, असे सांगितले. तसेच, जेव्हा ती करण जोहला भेटण्यासाठी जाणार होती, त्यावेळी तिच्या आईला त्यावर विश्वास बसत नव्हता, असेही सांगितले.
अंजली म्हणाली, “२०२०मध्ये मी माझ्या आयुष्यातील कठीण टप्प्यावर होते. त्यावेळी भारत सोडून जाण्याचा आणि अभिनय कायमचा सोडण्याचा विचार करत होते. मला अभिनयाच्या कोणत्याही ऑफर्स मिळत नव्हत्या. करोना होता. मी साठवलेले पैसे संपले होते आणि मी सहा महिने भाड्याच्या घरात एकटी राहत होते. त्यादरम्यान, माझ्या मित्रांनी मला जबरदस्तीने गोव्याला नेलं. त्याचवेळी मला YRFच्या कास्टिंग डायरेक्टर शनू शर्मा यांचा मेसेज आला. त्यांनी मला फोन करायला सांगितलं. मी त्याआधीही त्यांना भेटले होते. त्यावेळी प्रत्येक वेळी मला म्हणायच्या की तुझं वजन कमी झालं की आपण काहीतरी करू.”

पुढे अंजली म्हणाली, “मी करण जोहरला भेटायला जाणार आहे, असं आईला सांगितल्यावर ती मला म्हणाली की मोठी आली करण जोहरला भेटायला जाणारी. मी तिला सांगितलं की मी खरंच त्यांना भेटायला जाणार आहे.” अंजलीचे बोलणे ऐकून तिच्या आईने तसं का म्हटलं होतं, याबद्दल स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “झा मुद्दा एवढाच होता की इंडस्ट्रीमध्ये तिच्या पाठीशी कुणीही नाही. त्यामुळे मी तिला तसं म्हणायचे.”
अंजलीने करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये काम केले आहे. तिने या चित्रपटात तिने रणवीर सिंहच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तसेच, तिने त्याआधी ‘ढाई किलो प्रेम’ आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधून ओळख निर्माण केली आहे.

अंजलीने याआधी स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत वजन जास्त असल्याने भेदभावाला सामोरे जावे लागल्याचेही सांगितले. ती म्हणालेली, “माझं वजन जास्त आहे म्हणून मला अशा भूमिका ऑफर केल्या जातात, जेव्हा लोक त्याची फक्त थट्टा करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मला वाईट वाटतं. मी चांगली अभिनेत्री आहे की नाही, हेही ते पाहत नाहीत. ते फक्त माझ्या शरीरावरून माझं मूल्यमापन करतात. त्यांच्या मते, मी त्यांच्या सौंदर्याच्या निकषांमध्ये बसत नाही. पण मग त्यांच्या मते दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या रायसुद्धा पुरेशा चांगल्या नाहीत. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यावरही टीका झाली आहे. काही लोकांना केवळ आपलं मत व्यक्त करता येतं म्हणून ते व्यक्त करायचं असतं. पण ते म्हणतात म्हणून त्याच गोष्टी बरोबर असतात, असं नाही.”

दरम्यान, अंजली ‘धमाल ४’ सिनेमातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
