Ankita Walawalkar on New Home: अंकिता वालावलकर ही लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. अनेकदा ती तिच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने तिच्या नवीन घराबद्दल वक्तव्य केले आहे.

अंकिता वालावलकर नेमकं काय म्हणाली?

अंकिताने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “स्वत:चं घर असणं, ही मोठी भावना आहे. जेव्हा माझ्या प्रवासाची सुरुवात मुंबईत झाली, तेव्हा याच खोलीत मी माझ्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. ते माझं पहिलं काम होतं, ज्यासाठी मला पैसे मिळाले होते. त्यानंतरचा माझा जो मुंबईत प्रवास आहे, त्या प्रवासात मी नेहमी म्हणायचे की मला घर घ्यायचं आहे. ते घर घेण्यासाठी मी खूप धडपडले आहे, खूप मेहनत केली आहे. आता काहीजण म्हणतील की तू मुंबईत नाही, पनवेलला घर घेतलं आहेस. तो वेगळा वाद आहे. पण, आम्ही जेव्हा देवबागसारख्या गावातून शहरात येतो, तेव्हा आम्हाला ती सगळी मुंबईच वाटते. मोठ्यमोठ्या इमारती वगैरे, हे आमच्यासाठी शहर आहे.”

“कुणालला गावी घर हवं आहे”

पुढे ती म्हणाली, “कुणालला रिस्क घेण्याची थोडी भीती असते. मी कायम त्याला हेच म्हणते की तुम्ही लहान भावंडं असता, त्यांना रिस्क घ्यायला भीती वाटते कारण, मोठी भावंडं सगळी रिस्क घेत असतात. लग्नानंतर आम्ही बऱ्याच इंटरनॅशनल ट्रीप केल्या. मी कुणालला म्हणाले की आपण हे करत राहणार आहोत. पण, मला या पृथ्वीवरती एकतरी कोपरा आपल्या दोघांचा बनलेला हवा आहे. तो मला म्हणाला की तू हट्टी आहेस, तू ऐकणार नाहीस. मी त्याला म्हणाले की मी काहीही करून घेणार. त्याला गावी घर हवं आहे. शहरात फ्लॅटमध्ये राहायचं आहे, असं त्याचं नाही. तो म्हणतो की काही काळानंतर मी निवृत्ती घेणार आणि गावी मला छोटंसं घर, शेती असं काहीतरी हवं आहे. मी विचार केला की गाव आणि शहर या दोघांचा मला समतोल साधावा लागणार. शहरही माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे, कारण माझे ब्रँड आहेत. मग मी त्याला म्हणाले की छोटं का होईना पण, काहीतरी घेऊया.”

अंकिता असेही म्हणाली, “ज्या दिवशी घराचं टोकन दिलं, त्या दिवशी मी रडले. जेव्हा घराच्या पेपरवर सह्या करायच्या होत्या, तेव्हा कुणाल दोन रात्री झोपलाच नाही. मोठी रिस्क आहे, असं त्याला वाटत होतं. पण, आता त्याला वाटतं की बरं झालं आपण तेव्हा घर घेतलं. तर, हा प्रवास अजूनही चालूच आहे. आता घराचं इंटिरिअर चालू आहे, त्यामुळे हा प्रवास न संपणारा आहे”, असे म्हणत मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे अंकिताने सांगितले.

दरम्यान, याच मुलाखतीत अंकिताने मुंबईत आल्यानंतर विविध ठिकाणी बहि‍णींबरोबर भाड्याने राहत होते, असेही सांगितले. आता तिने पनवेलमध्ये २ बीएचके घर घेतले आहे.