Ankita Walawalkar on Anurag Dobhal Viral Video: बिग बॉस १७ फेम आणि प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोभाल ऊर्फ UK07 रायडरने सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. कुटुंबाचा छळ, आंतरजातीय लग्नाला विरोध आणि पत्नी रितिकाने साथ सोडल्यामुळे अनुराग प्रचंड नैराश्यात असून त्याने टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी दिली आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने केलेली पोस्ट चर्चेत आहे.

‘UK07 रायडर’ म्हणून प्रसिद्ध असलेला लोकप्रिय यूट्यूबर अनुराग डोभाल सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. अनुरागने आपल्या यूट्यूब चॅनलवर २ तासांचा एक मोठा व्हिडीओ शेअर करत आपले आई-वडील, भाऊ आणि नातेवाईकांवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या निधनानंतर हे लोक खोटं बोलतील, पण माझ्या मृत्यूला माझे कुटुंबीयच जबाबदार असतील,” असे म्हणत त्याने सर्वांना हादरवून सोडले आहे. विशेष म्हणजे, ज्या पत्नीसाठी तो सर्वांच्या विरोधत गेला, ती देखील इतरांच्या सांगण्यावरून त्याला सोडून गेल्याचा दावा त्याने केला आहे. ५ दिवसांपासून उपाशी असलेल्या अनुरागने सध्या प्रचंड मानसिक तणावात असल्याचं म्हटलंय.

“पडद्यामागचं रडणं आणि संघर्ष कोणालाच दिसत नाही”

अनुराग डोभालचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे. त्याचबरोबर तिने इन्फ्लुएन्सर्सच्या आयुष्यातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. “मी नेहमी एक गोष्ट सांगते, सोशल मीडियावर कोणालाही खूप आनंदी, परफेक्ट आयुष्य जगताना पाहून तुम्ही तुमचं आयुष्य त्यात गुंतवू नका. आम्ही सगळेच आपली एडिट केलेली लाईफ दाखवतो. छान क्षण, हसरे फोटो, ट्रॅव्हल, सेलिब्रेशन हे सगळं तुम्हाला दिसतं. पण त्यामागचं रडणं, ताण, संघर्ष, मतभेद हे सहसा स्क्रीनवर येत नाही. आम्हालाही समस्या असतात. कधी आर्थिक ताण, कधी वैयक्तिक प्रश्न, कधी मानसिक थकवा, फरक इतकाच की आम्ही ते सगळं कॅमेऱ्यावर दाखवत नाही. इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करा, प्रेरणा घ्या, पण आंधळेपणाने नाही. स्वतःची विचारशक्ती जपा. स्वतःच्या आयुष्याला, नात्यांना आणि ध्येयांना प्राधान्य द्या. इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य घडवण्यात वेळ गुंतवा. कारण शेवटी तुमचं वास्तवच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे,” अशी पोस्ट अंकिता वालावलकरने केली आहे.

पाहा पोस्ट

Ankita Walawalkar on Anurag Dobhal Viral Video
अंकिता वालावलकरची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

तिच्या या पोस्टवर अनेकांनी हे १०० टक्के सत्य असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अनुराग डोभालचा व्हिडीओ पाहून चाहते काळजी व्यक्त करत आहेत. तो बरा असावा, त्याने काही बरं-वाईट करू नये, अशी प्रार्थना चाहते करत आहेत.