Ankita Walawalkar on Diveagar Drowning Tragedy: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर येथे पुण्यातील विनर्स क्लासेसच्या ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने या घटनेवर अत्यंत भावूक पोस्ट लिहून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. कोकणात येणाऱ्या पर्यटकांनी आनंदात आणि सुरक्षिततेत सुट्ट्या व्यतीत कराव्यात, यासाठी तिने स्थानिकांचा सल्ला मानण्याचे आणि समुद्राच्या धोक्याचा अंदाज घेण्याचे महत्त्वाचे आवाहन सर्व पर्यटकांना केले आहे.

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर इथे पर्यटनासाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. पुण्यातील आळंदी येथील विनर्स क्लासेस मधील अकरावी आणि बारावीचे ४८ विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. ज्यात २५ मुले आणि १७ मुलींचा समावेश होता. दुपारी जेवण करून सर्व जण समुद्रावर गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने यातील आठ जण बुडाले. या घटनेवर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने पोस्ट केली आहे.

अंकिता वालावलकरने पर्यटकांना केली विनंती

“दिवेआगर इथे समुद्रात बुडून झालेल्या ८ मुलांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून सहवेदना. आता कोकणात पर्यटनाचा हंगाम सुरू होतोय. मी स्वतः कोकणातली मुलगी आहे, म्हणून कोकणात येणाऱ्या प्रत्येकाला एक विनंती- समुद्रात उतरण्याआधी स्थानिकांचा सल्ला नक्की घ्या आणि स्थानिकांनी धोक्याचा इशारा दिल्यास तो नक्की पाळा,” अशी विनंती अंकिता वालावलकरने केली.

ankita-walawalkar-diveagar-drowning-tragedy-pune-students
अंकिता वालावलकरची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

पुढे ती म्हणाली, “समुद्र शांत दिसत असला तरी पाण्याखाली जोरदार करंट असू शकतो. आपल्या अनेक समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षा व्यवस्था नसते, पण स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांना समुद्राची आणि पाण्याच्या प्रवाहाची चांगली माहिती असते. आपण कोकणात आनंद घेण्यासाठी येतोय, त्या आठवणी घेऊन परत जाण्यासाठी येतोय. त्या आठवणी सुंदर असूदेत, दुःखद नाही. सुरक्षित राहा.”

यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य वासनकर, राजवील वहिले, प्रणव बनसोडे, सुमीत अहिरे अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. दरम्यान, घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिक, वॉटर स्पोर्ट्स चालक आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नानंतर आठही जणांना शोधून बाहेर काढण्यात आले. मात्र तोवर सर्वांचा मृत्यू झाला होता.