Sunetra Pawar DCM Oath: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, आज ( ३१ जानेवारी ) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. दरम्यान, त्यांच्या शपथ ग्रहण समारंभानंतर अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
अंकिता वालावलकरची पोस्ट
अंकिता वालावलकर लिहिते, “सुनेत्रा पवार यांनी शपथ घेणं म्हणजे दुःख नाकारणं नव्हे. कधी कधी जबाबदारी स्वीकारणं हेच दुःखावर उत्तर असतं. काहीजण अशा प्रसंगी कोसळतात, तर काही जण अधिक ठामपणे उभे राहतात. दोन्ही मार्ग मानवीच आहेत. सोशल मीडियावर ट्रोल करणं खूप सोपं असतं. पण समोरची व्यक्ती काय अनुभवतेय, तिच्या मनात काय चाललंय, हे आपण जाणत नाही. संवेदनशीलता आणि समजूतदारपणा या गोष्टी आजच्या काळात फार गरजेच्या आहेत. राजकारणात टीका होणारच, प्रश्न विचारले जाणारच. पण व्यक्तिगत दुःखावर उपहास करणं हे आपल्याच समाजाचं प्रतिबिंब दाखवतं. विचार वेगळे असू शकतात, मतभेद असू शकतात, पण माणूसपण टिकवणं हीच खरी गरज आहे.”

राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली आहेत. मात्र, अजित पवार यांच्याकडे असणारं अर्थ आणि नियोजन खातं सध्या सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं नाही. अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. येत्या ६ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांकडून विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीकडे रवाना झाल्या आहेत.

