Suraj Chavan & Ankita Walawalkar : सूरज चव्हाणचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला. त्याच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उपस्थित होते. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने सूरजचं पहिलं केळवण केलं होतं. सूरजची पत्नी नेमकी कोण आहे हे सुद्धा सर्वांनी अंकिताच्या व्हिडीओमध्येच पाहिलं होतं. अंकिताने तेव्हाच सर्वांना ती सूरजच्या लग्नकार्यात उपस्थित राहू शकणार नाही याबद्दल सांगितलं होतं. कारण, आधीच नियोजन केल्याप्रमाणे नागपूरमध्ये आणखी एका लग्नाला अंकिताला उपस्थित राहायचं होतं. अंकिता भावाच्या लग्नाला उपस्थित नसली तरीही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने सूरज व संजना या दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

अंकिता वालावलकरने लग्नाला येऊ शकणार नाही याची कल्पना आधीच सूरजला दिली होती. अंकिता आता काही दिवसांनी सूरज व संजना यांना भेटायला जाणार आहे. मात्र, लाडक्या भावाचा लग्नसोहळा पार पडल्यावर अंकिताने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने या दोघांनाही खास सल्ला दिला आहे.

सूरज व संजना यांचा लग्नातील फोटो शेअर करत अंकिता लिहिते, “प्रिय सूरज आणि संजना…आज तुम्ही एकत्र हातात हात घालून नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहात. या वाटेवर कधी उजेड असेल, कधी अंधार, कधी सावल्या; पण एकमेकांचा आधार, माया आणि एकमेकांची सोबत असेल तर प्रत्येक अडचण सहज पार करता येते. जीवनात कितीही बदल झाले तरी एकमेकांसाठीचा आदर, आपुलकी आणि जिव्हाळा कायम ठेवा. छोट्या-छोट्या क्षणांत आनंद शोधा, एकमेकांच्या हसण्यात जग जिंका आणि एकमेकांच्या डोळ्यांतील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. नांदा सौख्यभरे! तुमच्या नवविवाहित जीवनाला मन:पूर्वक, हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा! – अंकिता आणि कुणाल!”

ankita
अंकिता वालावलकरची पोस्ट

दरम्यान, सूरज आता गोफणे कुटुंबाचा जावई झाला आहे. सूरज-संजनाचं लव्ह मॅरेज आहे. संजना त्याच्या चुलतमामांची मुलगी आहे. या दोघांच्या लग्नाला चाहत्यांनी सुद्धा प्रचंड गर्दी केली होती. सध्या सूरजचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.