‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता अंकुर वाढवेने शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यवतमाळमधील ‘पुसद’ या गावी त्याच्यावर २० ते ३० लोकांच्या टोळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी फेसबुक पोस्ट अंकुरने काही तासांपूर्वी शेअर केली आणि त्याच्या सगळ्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. हा हल्ला नेमका का झाला? नेमकं काय घडलं होतं? याबाबत अंकुरने आता दुसरी फेसबुक पोस्ट शेअर करत सर्वांना सविस्तरपणे सांगितलं आहे.
अंकुर वाढवेची पोस्ट
“काल पुसदमध्ये माझ्यावर २० ते ३० लोकांच्या टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने प्रकरण मिटलं. पण, यावरून लक्षात येतं की पुसद मध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. यावर प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे.” असं अंकुरने त्याच्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
नेमकं काय घडलं होतं?
पुढे, या घटनेबाबत सविस्तरपणे सांगताना अंकुर म्हणाला, “नमस्कार! मी पोस्ट शेअर केल्यानंतर मला अनेकांचे विचारपूस करण्यासाठी फोन येऊ लागले. त्यामुळेच मी लाइव्ह आलोय. मला काहीही झालं नाहीये, मी सुखरुप आहे. पुसदमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं…माझे काही मित्र त्या सिनेमासाठी प्रोडक्शनचं काम करत होते. ज्यावेळी त्यांना समजलं की, मी सुद्धा पुसदमध्ये आहे…त्यावेळी ते मला घरी भेटायला आले. आता माझ्या मित्रांबरोबर काहीजण असेही होते जे दारू प्यायले होते. त्यांनी आमच्या शेजारच्या घरांवर मद्यप्राशन करून लघुशंका केली. मग त्या लोकांनी मला फोन केला की, तुमचे पाहुणे आमच्या दारावर असा-असा प्रकार करत आहेत. त्यानंतर मी आणि माझ्या भावाने त्या लोकांना परत पाठवलं, आणि मित्रालाही पाठवून दिलं.”
“पण, हे सगळे गेल्यावर त्यात एक मुलगा होता…चूक त्याचीच होती. तो परत ३०-४० पोरं घेऊन आला. ते सगळे मारहाण करण्यासाठी आले होते…त्यातल्या काही लोकांनी मला ओळखलं. मग पुढे हे प्रकरण मिटलं…पण, त्यानंतर सकाळी उठल्यावर मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे, असे ३०-४० जण आले तर सर्वसामान्य लोकांची काय गत होत असेल? पुसदमध्ये किती गुन्हेगारी वाढलीये. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने हा प्रश्न सुटला खरा…पण, असे एका फोनवर मारहाण करण्यासाठी ३०-४० लोक येत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे. माझी प्रशासनाला एक विनंती आहे की, अशा गावगुंडांना खरंच समज देण्याची गरज आहे. यासाठीच व्हिडीओ शेअर केला…बाकी मी सुखरुप आहे.” अशी माहिती अंकुरने दिली आहे.
अंकुरच्या या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
