Zee Marathi Kamali Serial Promo : ‘कमळी’मालिकेत सध्या अनिका चांगुलपणाचं नाटक करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनिकामुळेच कमळीला अन्नपूर्णा महाविद्यालयातून सस्पेंड करण्यात आलं आहे. आता कमळीच्या शिक्षणाची जबाबदारी काही दिवसांसाठी हृषीने स्वीकारली आहे. हृषी कमळीला एवढी मदत करतोय हे अनिकाला बघवत नसतं. याशिवाय कमळी महाजनांची मोठी नात असल्याचं नाटक करतेय याचा अंदाजही अनिकाला असतो. म्हणूनच आता कामिनी, रागिणी आणि अनिका या तिघी मिळून ‘कमळी’ विरोधात मोठा डाव रचणार आहे.
‘कमळी’ने काही दिवसांपूर्वीच महाजनांच्या घरात अन्नपूर्णाची मोठी नात म्हणून एन्ट्री घेतली. खरंतर, कमळीच आजींची मोठी नात असते पण, हे सत्य सध्या सरोज ( गौरी- कमळीची आई ) सोडून इतर कोणालाही माहीत नसतं. कमळीच्या आईने लेकीच्या काळजीपोटी तिची ओळख सर्वांपासून लपवलेली असते. पण, याचा चांगलाच फटका आता कमळीला बसणार आहे.
अनिका-कामिनी आणि रागिणी या तिघीजणी एकत्र येऊन कमळी महाजनांची मोठी नात असल्याचं नाटक करतेय असा खुलासा अन्नपूर्णा आजीसमोर करतात. राजनदेखील त्याची चूक कबूल करतो. आपल्या एका चुकीची शिक्षा कमळीला मिळणार या विचाराने राजन हतबल होतो. तर, दुसरीकडे अन्नपूर्णा आजी कमळीला “तू खरंच माझी नात आहेस का?” असा थेट प्रश्न विचारते.
कमळीच्या तोंडून नाही असं उत्तर ऐकल्यावर अन्नपूर्णा आजीच्या पायाखालची जमीन सरकते. ती रागात कमळीला कानाखाली मारते. यानंतर अनिका कमळीला हाताला धरून घराबाहेर काढत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यात मालिकेत हा सगळ्यात मोठा उलगडा होईल.
पण, कमळीचा हा प्रोमो पाहून नेटकरी नाराज झाले आहेत. “हे खरं सत्य नाहीचे…कमळीची ओळख तिला समजली पाहिजे”, “बावळट सरोजमुळे हे सगळं झालंय तिने राजनला खरं सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती”, “अरे खरं दाखवा ना…हे सत्य नाहीये”, “कमळीचं नशीब खडतर नाहीये…तिची आई बावळट आहे असं म्हणावं लागेल”, “हे काय सुरूये या मालिकेत…कमळीच खरी नात आहे हे मोठं सत्य आहे”, “कामिनी जिंकलीच…आता लवकर खरंही बाहेर येऊद्या” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
दरम्यान, आता ‘कमळी’ अन्नपूर्णाची खरी नात असल्याचं सत्य सर्वांना केव्हा समजणार? महाजनांनी कमळीला घराबाहेर काढलंय ही बातमी सरोजला समजेल तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल? या सगळ्याची उत्तरं प्रेक्षकांना ‘कमळी’ मालिकेच्या आगामी भागात मिळतील.
