Anshuman Vichare Wife Post : अलीकडच्या काळात सेलिब्रिटींना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. नेटकरी, ट्रोलर्स आता कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणाऱ्या कमेंट्सही करू लागले आहेत. काही कलाकार अशा ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात. पण, आता बहुतांश सेलिब्रिटी विचित्र, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नकारात्मक कमेंट्सना जिथल्या तिथे चोख उत्तरं देतात. इतकंच नव्हे तर याचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर करतात. अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी पल्लवीने शेअर केलेली अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. नेटकऱ्याला कमेंट्समध्ये खडेबोल सुनावत “किती आणि का हा भेदभाव असावा?” असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
अंशुमनने सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत त्याच्या नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली होती. यामध्ये अभिनेत्याने त्याच्या घरी बुद्धांची मूर्ती ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं. यासंदर्भात कमेंट करत नेटकरी लिहितो, “अंशुमन विचारे घरात भगवान बुद्धांची मूर्ती बसवली आहेस आणि गळ्यात काय हनुमान…ओठात एक आणि पोटात एक करण्याची काय गरज?” अशी कमेंट करणाऱ्या नेटकऱ्याला पल्लवीने चांगलंच सुनावलं आहे.
“कारण अंशुमन तुझ्यासारख्या विचारसरणीचा नाही आहे, म्हणूनच त्याने बुद्धांची मूर्ती घरात बसवली आणि त्यासाठी वेगळं मंदिर सुद्धा केलं. कारण, फक्त त्याची बायको बौद्ध आहे तो नाही. गळ्यात हनुमान आहे कारण तो हिंदू मराठा आहे. त्याच्या ओठात आणि पोटात सगळीकडेच एक आहे…अंशुमन अतिशय चांगला माणूस आहे…तो तुझ्यासारखा भेदभाव करत नाही.” असं रोखठोक उत्तर अंशुमनच्या पत्नीने कमेंट्समध्ये दिलं आहे.
या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत पल्लवीने सविस्तर पोस्ट देखील शेअर केली आहे.
पल्लवी विचारेची पोस्ट
जगा आणि जगू द्या!
किती आणि का हा भेदभाव असावा? आणि खरं तर असे प्रश्नच लोकांच्या मनात का निर्माण व्हावेत, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, कारण त्यांना त्या धर्मात समता, स्वातंत्र्य आणि माणुसकी दिसली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा, हीच त्यांच्या विचारांची खरी ताकद होती.
माझा नवरा ९६ कुळी मराठा आहे. पण जात, धर्म किंवा पंथाच्या नावावर भेदभाव करणं त्याच्या स्वभावातच नाही. उलट कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्याला अजिबात आवडत नाही. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध… आणि असंख्य जाती-जमातींची माणसं त्याचे जिवलग मित्र आहेत. त्यांच्या सुख-दुःखात स्वतःच्या माणसासारखा उभा राहणारा, त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेला तो माणूस आहे.
आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे… मी बौद्ध असूनही आमच्यात कधी या गोष्टीने काहीच फरक पडला नाही. माझा नवरा नेहमी बाबासाहेबांच्या जयंतीला जातो, घोषणा देतो आणि बुद्धांच्या चरणी नतमस्तक होतो, तितक्याच श्रद्धेने जितक्या श्रद्धेने तो स्वामींच्या चरणी डोकं ठेवतो.
आमच्या घरात दोन मंदिरं आहेत…
एक त्याचं, एक माझं.
तो माझ्या देवासमोर श्रद्धेने नतमस्तक होतो, मी त्याच्या देवासमोर. आणि आमची लेक तर दोन्ही मंदिरांत तितक्याच प्रेमाने पूजा करते.कारण आमच्या घरात धर्म वेगळे असले तरी श्रद्धा एक आहे, माणुसकी एक आहे आणि प्रेम त्याहून मोठं आहे.
शेवटी घर भिंतींनी बनत नाही, आणि नातं जात-धर्माने ठरत नाही…
माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची तयारी असेल, तर प्रत्येक धर्माच्या देवाला त्या घरात जागा मिळते.हीच खरी समता…
आणि कदाचित बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाचा खरा अर्थही हाच.
दरम्यान, या पोस्टवर मराठी कलाकारांसह अंशुमनच्या असंख्य चाहत्यांनी कमेंट्स करत पल्लवीचं कौतुक केलं आहे. “ताई.. खूप छान उत्तर दिलं आहेस” अशा प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर आल्या आहेत.
