Anuja Sathe on Women’s support to one another: अनुजा साठे ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने मराठी चित्रपटांसह बॉलीवूडमध्येदेखील काम केले आहे. काही ऐतिहासिक भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच ती मराठी-हिंदी मालिकांमध्येदेखील दिसली आहे.

आता अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक बाई दुसऱ्या बाईसाठी आनंदी होऊ शकत नाही, असे वक्तव्य केले आहे. तसेच, तिला आलेले अनुभवदेखील तिने सांगितले आहेत.

“बायका इतर बायकांसाठी…”

अनुजा साठेने नुकतीच आरपार या यूट्यूब चॅनेलवर हजेरी लावली होती. यावेळी अनुजा म्हणाली, “बायका इतर बायकांसाठी आनंदी होऊ शकत नाहीत. हे मी माझ्या आजूबाजूला घडताना पाहिलं आहे. माझ्या बाबतीतही हे घडलं आहे. नावं न घेता मी सांगू शकते. माझ्या काही प्रोजेक्टमध्ये अशा प्रोजेक्ट्स हेड होत्या, ज्या माझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करायच्या. एक प्रकारची ईर्षा असते. कुठेतरी त्यांना स्वत:चं महत्त्व तयार करायचं असतं.

“जेव्हा नवीन असता, तेव्हा तुमच्यावर दबाव टाकणं खूप सोपं असतं. मी कधीच त्या दबावाखाली काम केलं नाही. मी प्रत्युत्तर देते. म्हणजे मी एकदा-दोनदा ऐकते; पण त्यानंतर त्या व्यक्तीला सुनावेन की, हे वागणं बंद कर. मला हे आवडत नाही. मी असं वागायला सुरुवात केली होती.

उदाहरण सांगायचं, तर माझ्या क्लोज-अप शॉटच्या आधी मला ती महिला येऊन मला म्हणणार की, तुझ्या डोळ्यांच्या खाली खूप रेषा दिसत आहेत. तू खूप तरुण आहेस, हे झालं नाही पाहिजे. किंवा तिला अशा रंगाचे कपडे द्या की, ती सुंदर दिसेल. हे मी सगळं अनुभवलं आहे. एका वेळेला मला असं वाटायचं की बास. मी अशीच आहे आणि या माझ्यातील कमतरता आहेत. मला वाटतं असंच असायला पाहिजे.

आज आपण एखादी अशी व्यक्ती बघतो, जी सकाळी उठते. घरातली सर्व कामं करते. ऑफिसला जाते. संध्याकाळी घरी येते. ती सुंदरच असते. ती मेकअप न करतादेखील सुंदर दिसते. मग तिचे केस पांढरे झालेले असो किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं आलेली असोत, हे सगळं नैसर्गिक आहे. आणि स्क्रीनसाठी मेकअपचा वापर होतोच. पण, अशा पद्धतीच्या बोलण्यामुळे आत्मविश्वास, मनोबल कमी करू नका. त्यामुळे मी बोलायला सुरुवात केली होती. मी नेहमीच स्वत:साठी बोलले आहे. आज का हे म्हणायची गरज पडते की, बायकांनी बायकांना पाठिंबा द्यावा. कारण- आजपर्यंत ते झालेलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनुजा असेही म्हणाली की मी खूप नशिबवान आहे की माझ्या ज्या मैत्रीणी आहेत, त्या नेहमीच एकमेकींना पाठिंबा देत असतात.