Anup Soni Reaction on Ajay Devgn Crime Patrol Host : लोकप्रिय क्राइम थ्रिलर मालिका ‘क्राइम पेट्रोल’चे सूत्रसंचालन लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता अजय देवगण करणार आहे. मालिका विश्वामध्ये प्रचंड चर्चेत असलेल्या या मालिकेमध्ये बॉलीवूड अभिनेत्याची दमदार एन्ट्री झाल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. समाजातील गुन्हेगारी आणि त्यावर आधारित केस याची मांडणी केली जाते. आता मालिकेचे सूत्रसंचालन अजय देवगण करणार असल्याने ११ वर्षे या मालिकेचे सूत्रसंचालन अभिनेता अनुप सोनीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

‘क्राइम पेट्रोल’ मालिकेचा चेहरा बनलेला अनुप सोनी हा ११ वर्षांपासून या मालिकेचे सूत्रसंचालन करत होता. त्याची शांत, संयमी स्टाइल आणि केस समजवण्याची पद्धत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. मात्र, आता अनेक वर्षांनंतर मालिकेच्या निर्मात्यांनी मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आता क्राइम पेट्रोलशी जोडला गेला असून यापुढे तो सूत्रसंचालन करणार आहे. निर्मात्यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत मला यावर जास्त काही बोलायचं नाही म्हणत अजय देवगण स्वतःची शैली आणि दृष्टिकोन आणतील असा विश्वास अनुप सोनीनी व्यक्त केला.

अनुप सोनीची ‘क्राइम पेट्रोल’वर पहिली प्रतिक्रिया

‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुप सोनीने ‘क्राइम पेट्रोल’ मालिकेबद्दल मत व्यक्त केले. तो म्हणाला, “याबाबत मला जास्त काही बोलायचे नाही. ‘क्राइम पेट्रोल’बरोबर माझा खूप चांगला आणि दीर्घकाळ असा संबंध राहिलेला आहे. या मालिकेमुळे मला प्रेक्षकांकडून जे काही प्रेम मिळालं आणि आपुलकी मिळाली, याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे.”

अजय देवगणबद्दल काय म्हणाला अनुप सोनी?

अनुप सोनीने यापुढे ‘क्राइम पेट्रोल’ मालिकेचे सूत्रसंचालन अजय देवगण करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मीसुद्धा अजय देवगण यांचा खूप मोठा चाहता आहे. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ आणि ‘अपहरण’ या दोन्ही सिनेमांमध्ये त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली होती. यापुढे अजय देवगण हे क्राइम पेट्रोलमध्ये त्यांची स्वत:ची वेगळी शैली आणि त्यांचा खास दृष्टिकोन आणतील. माझ्याकडून क्राइम पेट्रोलच्या संपूर्ण टीमला पुढच्या प्रवासासाठी आणि नवीन पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा.”

इतर सिनेमांमध्ये झळकणार अनुप सोनी

‘क्राइम पेट्रोल’मधून बाहेर पडला असला तरी अनुप सोनी मनोरंजनविश्वामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करत राहणार आहे. अनुप सोनी म्हणाला, “माझी एक नवीन वेब सीरिज आणि एक चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या दोन्हीमध्ये माझ्या भूमिका खूप वेगळ्या आहेत. ‘क्राइम पेट्रोल’ला प्रेक्षकांनी जे प्रेम आणि आपुलकी दिली, तेच प्रेम या नव्या प्रोजेक्ट्सनाही मिळेल, अशी मला आशा आहे.”

    अजय देवगण करणार ‘क्राइम पेट्रोल’चे सूत्रसंचालन

    दरम्यान, ‘क्राइम पेट्रोल’च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आता अजय देवगणने स्वीकारली आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेचा एक टीझरही शेअर केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, अजय देवगणने क्राइम पेट्रोलच्या १५ एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले असून त्याच्या सूत्रसंचालनाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. अजय देवगणने यापूर्वी अनेक पोलिस व गुन्हेगारी संबंधित सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अजय देवगणने यापूर्वी ‘गंगाजल’, ‘दृश्यम’ आणि ‘सिंघम’ फ्रँचायझीमध्ये पोलिस आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. गुन्हेगारी, तपास आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित भूमिका ही अजय देवगणची ओळख राहिली असून यानंतर आता तो क्राइम पेट्रोलचे सूत्रसंचालन करणार आहे.