Ashwini Bhave USA Home : ‘लिंबू कलरची साडी’ हा डायलॉग आठवल्यावर प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी अभिनेत्री अश्विनी भावेंचा चेहरा येतो. ९० च्या दशकात हिंदीसह अनेक मराठी सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सध्या त्या अमेरिकेत वास्तव्याला असतात. फक्त कामानिमित्त त्या भारतात येतात. पण, अमेरिकेत असूनही त्यांचं मनोरंजन विश्वाशी आजही तेवढंच घट्ट नातं आहे. काही दिवसांपूर्वीच नीना कुलकर्णी, अमृता सुभाष अशा लोकप्रिय कलाकारांनी अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी भेट दिली होती. आता या पाठोपाठ बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी सुद्धा अश्विनी भावेंच्या सॅन फ्रान्सिस्को येथील घरी भेट दिल्याचं पाहायला मिळालं.
अश्विनी भावेंनी याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या लिहितात, “सॅन फ्रान्सिस्कोमधील आमच्या घरी अनुपम आणि ‘जाने पहचाने अनजाने’ची संपूर्ण टीम खास दुपारच्या लंचसाठी आली होती. त्यांचं स्वागत करणं हा आमच्यासाठी अतिशय आनंददायी अनुभव होता.”
अश्विनी पुढे म्हणाल्या, “अनुपम यांच्याबरोबर काम करत असताना मला त्यांची एक गोष्ट मला कायमच भावली. ती म्हणजे ते नेहमीच विविधांगी भूमिका साकारण्यास प्राधान्य देतात. मग ते चित्रपटात असो, नाटकात असो किंवा टेलिव्हिजनवर…या सगळ्या गोष्टी करत असतानाही त्यांच्या मनात सतत काहीतरी नवीन शिकण्याची ओढ कायम असते. हे खरंच सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.”
“कधीकधी काम, आपलं यश या सगळ्यापलीकडे जाऊन एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेणं, गप्पा मारणं, मनमोकळेपणाने हसणं आणि दुपारी निवांतपणे वेळ घालवणं हा खूपच सुखद अनुभव असतो. आम्हाला या भेटीदरम्यान हे सगळं एन्जॉय करता आलं, याचा मला आनंद आहे” असं कॅप्शन अश्विनी भावेंनी या फोटोंना दिलं आहे.
दरम्यान, “मॅडम खूप सुंदर फोटो”, “तुमचा साधेपणा कायम मनाला भावतो” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या फोटोंवर दिल्या आहेत.
