‘अनुपमा’मध्ये राहीची भूमिका करणारी अद्रिजा रॉय लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अद्रिजा २५ जानेवारी रोजी तिच्या फार्महाऊसवर साखरपुडा करणार आहे. अद्रिजाच्या होणाऱ्या पतीचे नाव विघ्नेश अय्यर आहे. अद्रिजाने तिची व विघ्नेशची पहिली भेट कधी आणि कुठे झाली, हे सांगितलं.

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अद्रिजा म्हणाली, “आम्ही गेल्या वर्षी मे महिन्यात एका कॉमन मित्राच्या पार्टीत पहिल्यांदा भेटलो होतो. पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांकडे आकर्षित झालो. त्यानंतर विघ्नेशने पुढाकार घेतला आणि मग आम्ही एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ घेतला. सुरुवातीला काही काळ आम्ही एकमेकांशी इन्स्टाग्रामवर बोलत होतो, नंतर भेटायचं ठरवलं. आणि आता आम्ही साखरपुडा करतोय.”

अद्रिजा होणाऱ्या पतीबद्दल काय म्हणाली?

२६ वर्षांची अद्रिजा पुढे म्हणाली, “आम्ही दोघेही खूप साधे आहोत. मला नेहमीच अशा व्यक्तीबरोबर राहायचं होतं, जो आमच्या इंडस्ट्रीतला नसेल. मला जसा जोडीदार हवा होता, तसाच विघ्नेश आहे.”

Award Banner

अद्रिजाने मुलाखतीत असंही सांगितलं की तिने साखरपुड्यासाठी तीन दिवसांची सुट्टी घेतली आहे. तिच्या टीमने आधीच तिचे सीन शूट केले आहेत जेणेकरून ती सुट्टीवर असताना काम थांबणार नाही. साखरपुड्यासाठी संपूर्ण टीमला आमंत्रित केलं आहे, अशी माहितीही अद्रिजाने दिली.

अद्रिजा रॉय लग्न कधी करणार?

अद्रिजाला लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आलं. “या वर्षी आम्ही लग्न करण्याचा विचार करत नाही आहोत. तो दक्षिण भारतीय, तमिळ आहे आणि मी बंगाली आहे, त्यामुळे आमच्या संस्कृती पूर्णपणे वेगळ्या आहेत. माझे स्वप्न दक्षिण भारतीय आणि बंगाली दोन्ही रीतिरिवाजांनुसार लग्न करण्याचे आहे. त्यासाठी पुरेसा वेळ आणि नियोजन आवश्यक आहे, म्हणून आम्ही पुढील दोन वर्षांत लग्न करू असा विचार करतोय,” असं अद्रिजा रॉयने सांगितलं.

अद्रिजा रॉयने साखरपुड्याची बातमी दिल्याने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. अद्रिजावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अद्रिजाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती सध्या अनुपमा मालिकेत राही नावाची भूमिका करत आहे.

अद्रिजाने इमली, कुंडली भाग्य, दुर्गा और चारू, बॉयफ्रेंड अँड गर्लफ्रेंड्स या मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.