Anupamaa Fame Shivani Gosain Story: छोट्या पडद्यावरील ‘कहानी घर-घर की’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी गोसाई (Shivani Gosain) सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. ‘अनुपमा’ मालिकेत ‘मेघा’ची भूमिका साकारणाऱ्या शिवानीने सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये आपल्या आयुष्यातील कडू आठवणींना उजाळा दिला. शिवानीने सांगितले की, तिचे पहिले लग्न अवघ्या १७ व्या वर्षी झाले होते, मात्र सासरी सुख मिळण्याऐवजी तिला नरकयातना भोगाव्या लागल्या. ५ महिन्यांची गरोदर असताना तिला अमानुष मारहाण करण्यात आली. इतकेच नाही, तर बाळ जन्माला आल्यावर तिचा पती तिला भेटायलाही आला नाही आणि त्याने दुसरे लग्न केल्याचे समोर आले.
‘अनुपमा’ मालिकेत ‘मेघा’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी गोसाई हिला खऱ्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. व्यावसायिक आयुष्यात यश मिळवूनही वैयक्तिक आयुष्यात तीन वेळा तिची फसवणूक झाली. सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये शिवानीने सांगितलं की, तिचं पहिले लग्न अवघ्या १७ व्या वर्षी झालं होतं. लग्नानंतर सासरी सुख मिळेल असं तिला वाटलं होतं, पण प्रत्यक्षात तिला खूप त्रास सहन करावा लागला.
गरोदरपणात मारहाण आणि अत्याचार
शिवानी म्हणाली की तिच्या सासरच्या लोकांकडून आणि पतीकडून तिच्यावर सतत अत्याचार केले जात होते. तिला कुठेही जाण्या-येण्याची परवानगी नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा ती ५ महिन्यांची गरोदर होती, तेव्हा तिला प्रचंड मारहाण करण्यात आली. या छळाला कंटाळून अखेर तिने सासर सोडलं.
गर्भपाताचा दिला सल्ला
शिवानी गोसाईने सांगितलं की, कठीण काळात अनेकांनी तिला गर्भपाताचा सल्ला दिला होता. परंतु, तिने आपल्या बाळाला जन्म देण्याचा ठाम निर्णय घेतला. जेव्हा तिच्या मुलीचा जन्म झाला, तेव्हा तिचा पती किंवा सासू तिला भेटायलाही आले नाहीत. त्यानंतर तिला समजलं की, तिच्या पतीने दुसरं लग्न केलं आहे.
बॉयफ्रेंडनेही दिला त्रास
शिवानीचं पहिलं लग्न मोडल्यानंतर तिच्या आयुष्यात एका नवीन पुरुष आला. आता सर्व काही ठीक होईल, असं तिला वाटलं होतं. मात्र, तिच्या बॉयफ्रेंडने देखील तिच्यासोबत तसाच छळ केला, जसा तिच्या एक्स पतीने केला होता. तिचा बॉयफ्रेंड अत्यंत रागीट आणि हिंसक होता, तो तिला मारहाण करायचा. अखेर त्रास सहन न झाल्यामुळे तिने त्याच्याशी नातं तोडलं.
दुसऱ्या लग्नानंतरही अत्याचार
दोन वेळा अत्यंत वाईट अनुभवातून गेल्यानंतर शिवानी गोसाई तिसऱ्यांदा प्रेमात पडली. दुसऱ्या लग्नापूर्वी तिने सर्व गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. तिने आपल्या दुसऱ्या पतीला सांगितलं होतं की, आता पुन्हा फसवणूक सहन करण्याची तिची ताकद नाही. तिच्याबरोबर काहीच चुकीचं घडणार नाही, अशी खात्री तिला त्याने दिली होती. पण दुसऱ्या लग्नानंतरही तिच्याबरोबर तेच घडलं. या लग्नातही तिचा छळ झाला.
शिवानीने सांगितलं की, तिच्या दुसऱ्या पतीने तिला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्वच स्तरांवर प्रचंड त्रास दिला. अखेर या छळाला कंटाळून तिने आपलं दुसरं लग्नही मोडलं. आता ती एक ‘सिंगल मदर’ म्हणून आपल्या मुलीचा सांभाळ करत आहे.
